- अजित पवार यांचे प्रतिपादन; कोविड रुग्णालयाचे लोकार्पण
पिंपरी – करोनायोद्धे जीवाची बाजी लावून काम करत आहेत. आपणाला करोनाला अटकाव करावयाचा असून नागरिकांनी करोना विषाणूसंबंधी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विषाणूचा अटकाव करण्यासाठी मास्कचा वापर गरजेचा असून मास्कविना फिरणाऱ्यांकडून यापुढे एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करोना बाधितांवर उपचार करण्यासाठी ऑटो क्लस्टर येथे 200 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन तथा लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे होते. तर कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह विविध अधिकारी, आजी माजी नगरसेवक व महापालिकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयामुळे कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही. रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. करोनामुळे आजी-माजी नगरसेवकांना आपले प्राण गमवावे लागले. आपण एकजुटीने करोनाविरोधात लढून करोनाला हद्दपार केल्यास त्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वतंत्र रुग्णालय उभारले ही अत्यंत चांगली बाब आहे. शहरातील मृत्यूदर नियंत्रणात असला तरी तो आणखी कमी करण्यासाठी प्रशासनाने काम करणे गरजेचे आहे. महापालिकेने वैद्यकीय उपचारांची गरज ओळखून केलेल्या उपाययोजना निश्चितच कौतुकास्पद आहेत. महापौर माई ढोरे म्हणाल्या, महापालिकेच्या वतीने करोनाकाळात चांगले काम केले आहे. अत्यंत कमी कालावधीत हे रुग्णालय उभारले असून शहरातील नागरिकांना या रुग्णालयाचा फायदा होईल. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रस्ताविक केले, सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर शेवटी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आभार मानले.
लगेच ब्रेकिंग न्यूज
करोना रुग्णालयासाठी मी आणि दवेंद्र फडणवीस एकत्र येणार हे कळताच कालपासून हीच ब्रेकींग न्यूज बनल्याचे अजित पवार म्हणाले. मी आणि फडणवीस येणार हे माहिती झाले मात्र चंद्रकांत पाटीलही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार हे माहीत झाले असते तर आजच्या मोठ्या बातम्या “दोन दादा अन् फडणवीस’ एकत्र असाच मथळा बनला असता, अशीही कोटी पवार यांनी यावेळी केली.
जुगलबंदी रंगलीच नाही
उपमुख्यमंत्री अजित दादा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तिघे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जाहीर कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदाच एकत्र आले. अजित पवार यांनी एखादी कोटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनीही आवरते घेतले. त्यामुळे इतर दोघांनीही राजकीय भाष्य टाळल्याने दोन दादा आणि फडणवीस यांची जुगलबंदी ऐकायला मिळेल, या अपेक्षेत असलेल्या राजकीय नेत्यांसह उपस्थितांचा एका अर्थाने हिरमोड झाला.