पिंपळे निलख – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी दिले होते. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयानुसार सर्वेक्षण करून वाहनांवर नोटीस चिकटवून ती वाहने निलावात काढण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अजूनही शहर परिसरातील बेवारस वाहने रस्त्यांच्याकडेला धूळ खात पडून आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. अशा बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि उपनगरांमधील रस्त्यांवर नादुरुस्त तसेच अपघात झालेले आणि जुनी वाहने आढळून येत आहेत. या वाहनांना नेमके मालक कोण आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. विविध ठिकाणी नागरिक व इतर जुनी वाहनविक्री करणारे तसेच स्क्रॅप व्यावसायिक दुचाकी व चारचाकी वाहने बेवारस व इतर भागातून आणून दुसऱ्या परिसरात सोडून जात आहेत. वाहने नागरिकांनी कालबाह्य होणे, दुरुस्ती खर्च न झेपणे, बंद व खराब वाहनांना उभी करण्यासाठी जागा नसणे, विना कागदपत्रे असणारी वाहने अशा अनेक गोष्टी कारणीभूत असणारे वाहन कोणत्याही प्रकारचा विचार नकरता रस्त्यावर कडेला लावून व बेवारस सोडून दिली जात आहेत.
शहरातील सांगवी फाटा, पिंपळे निलख, कासारवाडी, वाकड, डांगे चौक, पिंपळे सौदागर, स्पाइन रोड, घरकुल चौक, कुदळवाडी, चिखली, आकुर्डी रस्ता आदी परिसरात अनेक वर्षे झाली ही बेवारस वाहने दिसून येत आहेत. अशा वाहनांवर धूळ, गवत, झुडपे वाढून अस्वच्छता पसरली आहे. ही वाहने उचलण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस या बाबीकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाहीत. बेवारस वाहने जप्त करून मूळ मालकांवर कारवाई करण्यात येत नसल्याने असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
येथे आहेत बेवारस वाहने
सांगवी फाटा, बीअरटीएस रोड, सार्वजनिक बांधकाम विभाग मैदानावर, स्पाइन रोड, आकुर्डी चिखली मार्ग, पिंपरी ते चिखली मार्ग, कुदळवाडी, पिंपळे निलख येथील मानकर चौक, मुख्य बस स्थानक, विशाल नगर, नवीन डीपी रोड, जगताप डेअरी परिसर आदी ठिकाणी अशी अनेक बेवारस वाहने वर्षानुवर्षे पडून आहेत. ही वाहने रस्त्याच्या कडेला असल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आरटीओ, महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करावी.
क्षेत्रीय कार्यालयाची बघ्याची भूमिका
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या परिसरातील बेवारस वाहनांची पाहणी करून त्यावर नोटीस चिकटविण्याचे आदेश दिले होते. परंतु आयुक्त असताना काही प्रमाणात ही मोहीम राबविण्यात आली. परंतु आयुक्तांची बदली होताच ही मोहीम बासणात घुंडळण्यात आली. आता क्षेत्रीय कार्यालयाकडून अशा बेवारस वाहनांवर कारवाई होताना दिसून येत नाही.