पिंपरी – केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात पिंपरी-चिंचवड महापालिकेने राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या कामगारिमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरूवारी (दि. १५) दिल्ली येथे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले. नागरिकांचा प्रतिसाद (फीडबॅक) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. त्यासाठी नागरिकांकडून प्रश्नांची उत्तरे घेण्यात आली. या गटात कचरामुक्त शहरामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला फाइव्ह स्टार तर, हागणदारीमुक्त शहर विभागात पिंपरी-चिंचवडला सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. स्वच्छ शहराबाबत मोबाइल व सोशल मीडियावरून संवाद साधून नागरिकांचे अभिप्राय मागविण्यात आले. स्वच्छ शहरासाठी ७ हजार ५०० गुण होते. त्यासाठी विभागानुसार गुणांची विभागणी केली जाते. निरीक्षण, नागरिकांचा प्रतिसाद, स्वच्छ सुधारणा आणि हागणदारीमुक्त शहर व स्टार रेटिंग अशा चार विभागांसाठी गुण देण्यात येतात.