पिंपरी, दि. 7 – कोयता आणि तत्सम हत्यारे खरेदी करण्यासाठी आधार क्रमांक देण्याचा पुणे पोलिसांनी निर्णय घेतला. तशा प्रकारचा उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्या निर्णयाचा अभ्यास करणार आहेत. शहराच्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्यात अपेक्षित बदल करून लागू करता येईल का, याची चाचपणी पोलीस करीत आहेत.
पुण्यात कोयता गॅंगने उच्छाद मांडल्यानंतर शहरात कोयते कुठून येतात याबाबत पोलिसांनी पडताळणी केली. ज्या ठिकाणाहून कोयते येतात तिथे कोयते विकत घेताना संबंधितांनी आधार क्रमांक आणि कोयता वापरण्याचे कारण देणे बंधनकारक असल्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले. शहरात येणाऱ्या अवैध शस्त्रांवर अंकुश ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या निर्णयाची पिंपरी-चिंचवड शहरात अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अभ्यास सुरू केला आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात हिंजवडी, शिरगाव, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात शेती परिसर आहे. औद्योगिक वसाहतींसह कृषी क्षेत्र असलेले शहर म्हणून देखील शहराची ओळख आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी लागणारी हत्यारे बेकायदेशीर कशी ठरवता येतील. कोयता सारखे एखादे शस्त्र तयार झाल्यानंतर त्याला कोणताही ओळख क्रमांक नसतो, त्यामुळे पकडलेले शस्त्र कायदेशीर की बेकायदेशीर हे समजण्याचा कोणताही पर्याय राहत नाही. त्यावर काय तोडगा काढता येईल, याची पडताळणी पोलीस करीत आहेत.