पिंपरी – ऑगस्ट महिन्यात खासगी बस ठेकेदाराकडील कंत्राटी चालकांनी संप पुकारला होता. यापुढील काळात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पीएमपीच्या बससेवेवर कोणताही परिणाम होऊ नये तसेच प्रवाशांना अपघात विरहीत व विना ब्रेकडाऊन सेवा मिळावी यासाठी परिवहन महामंडळाकडील चालकांना ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला व पीएमपीच्या 484 चालकांना ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात कायम पदावरील 272 व बदली रोजंदारी हंगामी 212 चालकांचा समावेश आहे.
पीएमपीच्या ताफ्यात एकूण 2089 बसेस आहेत. त्यात 991 बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. तर, 1098 बस ठेकेदारांच्या आहेत. ठेकेदारांकडील बसमधील 640 बस सीएनजी तर 458 ई-बस आहेत. ऑगस्ट महिन्यात ई-बसवरील काही चालकांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला होता.
ई-बसवरील चालकांच्या संपामुळे पीएमपीच्या सेवेवर काही प्रमाणात परिणाम झाला होता. ही बाब लक्षात घेवून परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांनी परिवहन महामंडळाकडील चालकांना ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांना 26 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षणांतर्गत परिवहन महामंडळाच्या एकूण 484 चालकांना ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आरटीओ नियमावलीही…
पीएमपीच्या मालकीच्या बस चालविणाऱ्या परिवहन महामंडळाकडील इतर चालकांना बस संचलनामध्ये उत्तम कामकाज, अपघात व ब्रेकडाऊन विरहीत सेवा, प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागणूक, आरटीओचे नियम आदी विषयांवर 27 जुलैपासून प्रशिक्षण देणे सुरू असून 15 ऑक्टोबरपर्यंत परिवहन महामंडळाकडील एकूण 978 चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.