पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी प्रशासनाने जल्लोष शिक्षणाचा या शैक्षणिक उपक्रमाचे नियोजन केले आहे. जानेवारी महिन्यात बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस व सिनेअभिनेता अमीर खान यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
गतवर्षी आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर सुमारे एक कोटी रुपये खर्च झाला होता. यंदा कार्यक्रमाला आणखी भव्य बनविण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये सजावट व अनुषंगिक बाबंवर भर दिला जाणार आहे. 21 ते 24 जानेवारीदरम्यान आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आतापासूनच महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शालेय स्तरावरील या विविध स्पर्धांना 30 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता विविध बाबींचे नियोजन आतापासूनच सुरू करण्यात आले असून, त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार दिल्लीमधील एका ठेकेदाराला हा ठेका देण्यात आला आहे.