पिंपरी, दि. 10 (प्रतिनिधी) – नेहरुनगर येथील पशू वैद्यकीय दवाखान्यातील लहान प्राण्यांच्या दहनासाठी असलेली गॅसदाहिनी जुनी झाली आहे, ती वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे याठिकाणी आता नवीन गॅसदाहिनी बसविण्यात येणार आहे. नवीन गॅस दाहिनीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंजुरी दिली असून निविदा काढण्याची प्रक्रिया विद्युत विभागाकडून हाती घेण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची व पाळीव श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरात सध्या 80 हजार पेक्षा जास्त भटके कुत्रे आहेत. तर 15 ते 20 हजार पाळीव श्वान आहेत. त्यामुळे शहरातील श्वानांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. त्यातील श्वान व भटकी कुत्री मयत झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नेहरुनगर येथील दफन भूमीत दफन करण्यात येत होते. परंतु, दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या वतीने नेहरूनगर-यशवंतनगर या मुख्य मार्गावर पाळीव श्वान, भटकी कुत्री, मांजर व इतर छोट्या प्राण्यांच्या दहनासाठी गॅस दाहीनी बसविण्यात आली. त्यानंतर दफन करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली. शहरातील दररोज आठ ते नऊ श्वान व भटक्या कुत्र्यांचे वाहिनीत दहन करण्यात येत आहे. परंतु, ही गॅस दाहिनी वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे त्यांचे दहन करण्यासाठी पुणे महापालिकेच्या गॅस वाहिनीमध्ये दहन करण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नेहरूनगर येथील गॅस दाहिनीचा बर्नर दुरुस्त करण्यात आला आहे.
सध्या येथे असलेली गॅसदाहिनीला 10 ते 12 वर्षे झाल्यामुळे ती जुनी झाली आहे. तिच्यात वारंवार तांत्रिक बिघाड होत असतात. त्यामुळे ही गॅसदाहिनी बंद पडल्यानंतर त्यावर पर्याय उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने नवीन गॅसदाहिनी बसविण्यात येणार आहे. येथे दहन करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. गॅदाहिनीच्या कामाची निविदा तयार करण्याचे काम पशुवैद्यकीय विभागाकडून नुकतेच हाती घेण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत याठिकाणी नवीन गॅस दाहिनी बसविल्यानंतर नागरिकांची होणारी गैरसोय कायमची दूर होणार आहे.
पर्याय उपलब्ध होणार
नेहरूनगर येथील गॅस दाहिनीमध्ये पाळीव कुत्रे, खाजगी श्वान यांना दहन करण्यासाठी 1 हजार रुपये शुल्क आकारले जातात. तर, शहरातील मोकाट भटकी कुत्र्यांचे मोफत दहन केले जाते. सध्या ही गॅसदाहिनी जुनी झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यानंतर नागरिकांना श्वान व अन्य छोट्या प्राण्यांच्या दहनासाठी पुण्यात जावे लागते. मात्र, दुसरी पर्यायी गॅसदाहिनी उपलब्ध करून दिल्यास त्यांची गैरसोय दूर होणार आहे. एका गॅसदाहिनीला दुसरा पर्याय उपलब्ध राहावा, या उद्देशाने पालिकेकडून दुसरी गॅसदाहिनी कार्यान्वीत करण्यात येणार आहे. गॅसदाहिनी ही पर्यावरण सुलभ असणार आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.