- कर्मचारी महासंघाची औद्योगिक न्यायालयात धाव ः वैद्यकीय अधिकाऱ्यांचा योजना सुरु ठेवण्याबाबत आदेश
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेली धन्वंतरी स्वास्थ योजना करोनाच्या संकटात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बंद केली होती. याबाबतचा आदेश 7 सप्टेंबर रोजी आयुक्तांनी काढला होता. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव ही योजना 14 सप्टेंबरपासून स्थगित करण्यात येत आहे. सर्व पॅनेलवरील रुग्णांलयांनी याची नोंद घेवून 15 सप्टेंबरच्या पहाटे एक नंतर धन्वंतरी योजनेतील कोणत्याही सभासदांना या योजनेअंतर्गत उपचाराकरिता दाखल करून घेऊ नये, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात स्पष्ट केले होते. मात्र आज पुन्हा हा आदेश मागे घेण्यात आला आहे.
करोना कालावधीत कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. या काळात कर्मचाऱ्यांचा विरोध डावलून योजना बंद केल्याने कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून काम करत निषेध व्यक्त केला. तसेच आयुक्तांच्या या निर्णयाबाबत औद्योगिक न्यायालय स्वारगेट याठिकाणी कर्मचारी महासंघाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत धन्वंतरी योजना ज्या पद्धतीने सुरू आहे तशी सुरू ठेवण्याबात आदेश दिले आहेत. त्यानंतर वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. पवन साळवे यांनी धन्वंतरी योजना सुरू ठेवण्याबाबतचा आदेश काढला. त्यामुळे करोनाच्या संकटामध्ये कर्मचारी महासंघाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी स्वास्थ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून ही योजना बंद करुन त्याऐवजी विमा पॉलिसी आणण्याचे प्रयत्न झाले. त्याला महासंघाचा विरोध होता. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अचानक 14 सप्टेंबर 2020 पासून योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र धन्वंतरी योजना बंद करण्याचे आदेश रद्द करून पुन्हा योजना सुरू ठेवण्याबाबत प्रशासन आदेश काढले आहेत.