- सत्ताधाऱ्यांशी “ऍण्टीचेंबर’मध्ये गुफ्तगु; वंचित बहुजनचे ठिय्या आंदोलन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या “ताटाखालचे मांजर’ बनल्याचा प्रत्यय आज सर्वसामान्यांना आला. विविध निविदांबाबत सत्ताधारी पदाधिकारी आणि नगरसेवकांशी “गुफ्तगु’ करण्यात दंग असलेल्या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मनमानीचा फटका आज (गुरुवारी) सर्वसामान्यांना बसला. सर्वसामान्यांच्या भेटीसाठी राखीव असलेल्या वेळेत तब्बल दोन तास वेटींग केल्यानंतर वैतागलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व नागरिकांनी आयुक्तांच्या कक्षासमोरच ठिय्या आंदोलन केल्याने हा विषय पालिकेच्या वर्तुळात चर्चेचा बनला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे सर्वसामान्यांसाठी कार्यरत आहेत की सत्ताधाऱ्यांच्या निविदा राबविण्यासाठी याबाबत वारंवार चर्चा निर्माण होत असतानाच त्यावर शिक्कामोर्तब करणारी घटना आज पालिकेत घडली. सायंकाळी 4 ते 6 ही वेळ सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी राखीव आहे. महापालिकेने विकसित केलेल्या स्पाईनरोड बाधित झोपडपट्टीधारकांचे गेल्या अकरा वर्षापासून अद्याप पुर्नवसन झालेले नाही. सेक्टर 22 संग्रामनगर येथील नागरिकांचे पुर्नवसन न झाल्याने या विषयावर आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी वंचित युवा आघाडीचे गुलाब पानपाटील हे बाधित नागरिकांना घेऊन आज (गुरुवार) सायंकाळी चार वाजता भेटण्यास आले होते. यावेळी आयुक्तांना भेटण्यासाठी कित्येक नागरिक आपआपल्या तक्रारी घेवून आले होते.
महापालिकेचे आयुक्त नागरिकांना भेटण्यासाठी दुपारी 4 ते 6 या वेळेत भेट देत असतात. पण, आयुक्त हर्डीकर हे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी व नगरसेवकांना घेऊन विविध निविदा प्रक्रियेवरील ठेकेदारीबाबत चर्चा करत ऍण्टीचेंबरला बसले होते. दीड तास बसूनही आयुक्त ऍण्टीचेंबरच्या बाहेर येत नव्हते. वारंवार विनंती करूनही आयुक्तांचे स्वीय सहायकही सर्वसामान्य नागरिकांसह प्रश्न घेऊन आलेल्यांना गांभिर्याने घेत नसल्याने आयुक्तांच्या दालनाबाहेर वंचित युवा आघाडीच्या सदस्यांनी गांधीगिरी पद्धतीने ठिय्या आंदोलन सुरू केले.
हा प्रकार पाहून आयुक्तांच्या स्वीय सहायकासह सुरक्षारक्षकांची धांदल उडाली. आयुक्तांना याविषयी कल्पना दिल्यानंतर आयुक्त हे ऍण्टीचेंबरच्या बाहेर आले. त्यांनी नागरिकांना भेटण्यास सुरुवात केली, तसेच झोपडपट्टीधारक नागरिकांना भेटून त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे गुलाब पानपाटील यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.
नेहमीच सत्ताधाऱ्यांचा वावर
महापालिका आयुक्तांच्या ऍण्टीचेंबरमध्ये नेहमीच सत्ताधारी पदाधिकारी आणि नगरसेवकांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. याबाबत यापूर्वीही सर्वसामान्यांनी तक्रारी केल्यानंतरही त्याची गंभीर दखल घेण्यात आलेली नव्हती. दुकानदारी आणि ठेकेदारासाठी सुरू असलेला प्रकार आजच्या प्रकारानंतर तरी आयुक्तथांबविणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयुक्तांच्या कारभाराची चौकशी करा
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन अनेक गैरप्रकार केले आहेत. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती गुलाब पानपाटील यांनी दिली. ते म्हणाले, आयुक्त हे प्रशासकीय प्रमुख असतानाही ते केवळ सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी तसेच दबावाखाली काम करत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यांनी केलेल्या बेकायदा कामांची कुंडली तयार केली असून त्याबाबत राज्य शासनाकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहे. तसेच कोविड सेंटर, चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवाने व अनेक निविदांमधील गैरप्रकाराबाबत न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचेही पानपाटील यांनी सांगितले.