- एकूण रुग्णसंख्या 27078 ः दिवसभरात 969 नवे रुग्ण
पिंपरी – “करोना’ने गेल्या 24 तासांमध्ये आणखी 21 रुग्णांचा बळी घेतला आहे. तर शहरातील 960 आणि शहराबाहेरील 9 जणांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 27 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर करोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंचा आकडा 566 झाला आहे. एका दिवसात 1121 अधिक रुग्णांना डिस्जार्ज देऊनही सद्यस्थितीत शहरात 5208 रुग्ण उपचाराधीन आहेत.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत 969 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील 960 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 9 जणांचाही तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 27,078 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 5208 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 373 रुग्णांचाही समावेश आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शुक्रवारी दिवसभरात 21 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 16 तर शहराबाहेरील 5 रुग्णांचा बळी गेला. शहरातील विकासनगर रहाटणी, पिंपळे गुरव, मोरवाडी, संत तुकारामनगर पिंपरी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, मोशी, काळेवाडी, दापोडी, रुपीनगर, दिघी, बिजलीनगर, नेहरूनगर येथील 16 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील शिरूर, नारायणगाव, चाकण, येरवडा येथील 5 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये चाकण येथील 35 वर्षीय महिलेचाही समावेश आहे.
आज दिवसभरात 1121 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 18,794 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2484 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील 2217 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.