मांजरी : मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीने महापालिका हद्दीतून मांजरी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या दूषित पाण्याच्या ओढ्याला जेसीबीच्या साह्याने बांध घालून अडविले आहे. गावच्या हद्दीत 5 ठिकाणाहून येणारे हे दुषित पाणी बंद करण्यात येणार आहे, असा आंदोलनाचा इशारा नुकताच ग्रामपंचायतीने महापालिकेला दिला होता. तेव्हा ग्रामपंचायत पदाधिकाऱयांनी आज आंदोलन करत यापैकी शेवाळेवाडी येथील दूषित पाण्याचा ओढा अडवला आहे.
महानगरपालिका हद्दीलगत असलेल्या मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत पालिकेच्या हद्दीतून मोठया प्रमाणात दुषित सांडपाणी वाहून येत आहे. त्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत खराब झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने येथील पाणी पुरवठा योजनेसाठी 10 कोटी रुपये द्यावे, अशी मागणी मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीने केली असून पालिकेने ही मागणी मान्य न केल्यास ग्रामपंचायत हद्दीत दुषित सांडपाणी बंद करण्यात येईल, असा इशारा मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच शिवराज घुले यांनी दिला होता. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आज प्रत्यक्षात संध्याकाळी शेवाळेवाडी हद्दीतून मांजरी हद्दीत येणाऱ्या दूषित पाण्याच्या ओढ्याला जेसीबीच्या साह्याने बांध घालून दूषित पाणी अडवले आहे.
यावेळी मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच शिवराज घुले, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम धारवाडकर,सदस्य प्रमोद कोद्रे, सदस्य सुमित घुले, सदस्य संजय धारवाडकर, नानासाहेब म्हस्के, भाऊसाहेब घुले, बबन जगताप आदीजण यावेळी उपस्थित होते.
आज सायंकाळी शेवाळेवाडी येथे मांजरी बुद्रुक हद्दीत वाहत येणारा दुषित पाण्याचा ओढा अडवून हे आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे झेंडे उंचावून आंदोलकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. महानगरपालिका हद्दीतील उरुळीदेवाची – फुरसुंगी -शेवाळेवाडी, सातववाडी- गोंधळेनगर – लक्ष्मी कॉलनी , हडपसर- साडेसतरानळी- गायरानवस्ती आणि केशवनगर येथून ओढ्यातून दुषित सांडपाणी मांजरी बुद्रुक हद्दीत सोडले जात आहे. याशिवाय मुंढवा जॅकवेलचे प्रक्रियाविरहित घाण पाणी कालव्यातून मांजरी बुद्रुक हद्दीतील अन्सारी फाटा, महादेवनगर ,घुले वस्ती भागातून वाहत आहे. त्यामुळे मांजरी बुद्रुक हद्दीतील खासगी व ग्रामपंचयातचे पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत खराब झाले आहेत.
येथील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत केवळ पालिका हद्दीतून येणाऱ्या दुषित सांडपाण्याळे झाल्याने महापालिकेने येथे सुरू असलेल्या ४३ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला पुढील कामाकरिता 10 कोटी 7 लाख रुपये द्यावे, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान याबाबत महापालिकेच्या मलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती विभागाच्या अधीक्षक अभियंता सुस्मिता शिर्के यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की सरपंच शिवराज घुले यांना संपर्क साधून आंदोलन करू नये अशी विनंती केली आहे. दरम्यान उद्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे.
आंदोलन अधिक तीव्र करणार
आज एकाच ठिकाणी हे दूषित पाणी अडविले आहे. महापालिकेने आमच्या मागणीची यापुढेही दखल घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करत उर्वरित ठिकाणच्या दुषित पाण्याचा ओढ्याना बांध घातले जातील असे सरपंच शिवराज घुले यांनी सांगितले.