पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात दुसऱ्या टप्प्यात 2 हजार 930 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मान्यतेने या कॅमेऱ्यांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यासाठी 169 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी सांगितले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महापालिकेने यापूर्वी 2 हजार 490 तर स्मार्ट सिटीने 3 हजार असे 5 हजार 490 सीसीटीव्ही बसविले आहेत. माजी नगरसेवक, सामाजिक संघटना व नागरिकांनी मागणी केल्यानुसार महापालिकेने पोलिसांची परवानगी घेऊन आणखी 2 हजार 930 सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहे.
शहरातील वर्दळीच्या चौक, रुग्णालय, शाळा, मंडई आदी विविध 500 ठिकाणी 2 हजार 800 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. दहा ठिकाणी वाहनांचे वेगावर लक्ष देणारे कॅमेरे लावण्यात येतील. तर, बीआरटीएस मार्गावर विविध 60 ठिकाणी 120 कॅमेरे लावण्यात येणार आहे. असे एकूण 2 हजार 930 कॅमेरे विविध 570 ठिकाणी लावण्यात येणार आहेत. लवकरच हे काम सुरू केले जाणार असल्याचे सहशहर अभियंता गलबले यांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटऱ्या चोरीचे प्रमाण वाढले
शहरातील विविध भागात तब्बल साडेपाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरेच सुरक्षित नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. विविध भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या चोरटे चोरून नेत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या चोरीला जात असल्याने कॅमेरेच सुरक्षित नसल्याचे म्हणावे लागत आहे.