Raksha Khadse | Eknath Khadse : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर नेतेही मंत्रिपदाची शपथ घेतील. यंदा मोदी 3.0 सरकारमध्ये कोणत्या चेहऱ्यांचा समावेश होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्यासोबत 65 नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिपदात स्थान मिळणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्याकरता भाजपा पक्षनेतृत्त्वाकडून रक्षा खडसे यांना आज फोन आला होता. त्यानुसार, त्या आज शपथविधीसाठी दिल्लीला जाणार आहेत.
त्यांच्याबरोबर त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही दिल्लीत दाखल होणार आहेत. दरम्यान, सूनेला मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दाटलेल्या कंठातून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “रक्षा खडसे केंद्रीय मंत्री होत असल्याचा मनस्वी आनंद आमच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना आहे. मला वाटतं की गेले अनेक वर्षे भाजपात काम करत असताना त्या कामाचं श्रेय आणि रक्षा खडसेंनी भाजपावर ठेवलेली निष्ठा याचं फळ म्हणून तिला आज शपथविधीसाठी बोलावण्यात आलं आहे.
साऱ्यांचेच आशीर्वाद आमच्या परिवाराच्या पाठीशी आहेत. खासकरून तिसऱ्यांदा तिला संधी दिली, याबद्दल मतदारांचे आभार. मतदारांमुळेच दिल्लीपर्यंत आणि मंत्रिपदापर्यंत जाण्याची संधी मिळीली”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही?
स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्हीके सिंह आणि अश्विनी चौबे या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही. तसेच अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह, आरके सिंह, अर्जुन मुंडा, निशीथ प्रामाणिक, सुभाष सरकार, जॉन बारला, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे आणि भागवत कराड यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश नसेल, अशी माहिती आहे.