Narendra Modi swearing in ceremony । NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडणार आहे.
नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 41 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पाच खासदारांचा देखील यामध्ये समावेश आहे.
यामध्ये पहिल्यांदाच पुण्याचे खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि रिपाईचे रामदास आठवले यांना संधी मिळाली आहे.
राष्ट्रपती भवनात संध्याकाळी 7.15 वाजता पंतप्रधान मोदींचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून आजच्या दिवसाची सुरुवात केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही त्यांनी सदैव अटल येथे आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन पुष्पहार अर्पण केला.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला शेजारील देशातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरत आहेत. पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला 8 हजार देशीविदेशी पाहुणे हजर झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रपती भवन परिसर गर्दीने भरून गेला आहे.