- 10 जणांचा मृत्यू; 792 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून गेल्या चोवीस तासांत करोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला आहे. शहरामध्ये आज दिवसभरात 1427 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 22 हजार 365 इतका झाला आहे.
महापालिकेने रविवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 1416 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 11 रुग्णांची नोंद झाली. तसेच दिवसभरात 10 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहरातील 8 तर शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, संभाजीनगर, मोशी, थेरगाव व काळेवाडी येथील 8 जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील पुणे व खेड येथील दोघांचा मृत्यू झाला.
दिवसभरामध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 792 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 9 हजार 588 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4504 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 2037 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये 1801 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 9094 वर पोहचली आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 10,895 इतकी आहे. तसेच आज सुट्टी असल्याने महापालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद होते. तर खासगी लसीकरण केंद्रांवर आज एकूण 1015 जणांना लस देण्यात आली.
ड प्रभागात अडीचशेहून अधिक रुग्ण
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ड प्रभागामध्ये आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. या प्रभागामध्ये पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरचा परिसर येतो. याठिकाणी आज तब्बल 267 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर त्याखालोखाल क प्रभागात 126, अ 218, ब 211, फ 196, ह 141, ग 133 व इ प्रभागात 124 रुग्ण आढळले आहेत.