पिंपरी : 99 टक्‍के पोलिसांनी केली करोनावर मात

  • करोनामुक्‍त होत असलेल्या पोलीस दलात पुन्हा दोनजण बाधित

पिंपरी – शहरात करोना वाढू नये म्हणून रस्त्यावर उतरुन लढणाऱ्या करोना योद्‌ध्यांना देखील करोनाने गाठले. परंतु या योद्‌ध्यांनी करोनाला मात देत पुन्हा आपल्या कर्तव्याची जबाबदारी संभाळली. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी अशा एकूण 517 जणांना करोनाची लागण झाली होती. 99 टक्‍के पोलिसांनी करोनावर यशस्वी मात केली. गेल्या आठ महिन्यांमध्ये करोनामुळे तीन पोलिसांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

चार दिवसांपासून पिंपरी चिंचवडमधील कोणत्या पोलीस कर्मचाऱ्यास करोनाची बाधा झाली नव्हती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस करोनामुक्‍त होत असल्याचे वाटत असतानाच गुरुवारी पुन्हा दोन पोलीस करोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे.

मार्च महिन्यापासून पिंपरी चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण मिळण्यास सुरुवात झाली. करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारने लॉकडाऊन घोषित केले. मात्र या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांचे होते. रस्त्यावरील बंदोबस्त असो, गस्त असो किंवा करोना रुग्णालयातील बंदोबस्त, सर्वच ठिकाणी पोलिसांचा नागरिकांची आणि करोना बाधित रुग्णांशी संपर्क येत होता. पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, हॅन्डग्लोज तसेच प्रतिकार शक्‍ती वाढविणाऱ्या औषधाचे वाटप करण्यात आले.

सर्वप्रथम किवळे येथे राहणारा व सध्या पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास करोनाची लागण झाली. त्यानंतर एकामागोमाग एक असे अनेक रुग्ण पोलीस दलात मिळू लागले. सुरुवातीपासूनच सतर्क असलेल्या अधिकाऱ्यांनी करोना बाधितांचा एक ग्रुप तयार केला. करोना बाधितास काय अडचण आहे, हे या ग्रुपच्या माध्यमातून जाणून घेतले.

तसेच उपचाराबाबत पोलीस अधिकारी थेट डॉक्‍टरांच्या संपर्कात असल्याने रुग्णाआधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना रुग्णास कशाची आवश्‍यकता आहे, याची माहिती होत होती. आवश्‍यक ती औषधे व इंजेक्‍शन अधिकारी उपलब्ध करून देत होते. मात्र दुर्दैवाने चाकण वाहतूक शाखेतील कर्मचारी संतोष झेंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो पिंपरी चिंचवडच्या पोलीस दलातील करोनाने घेतलेला पहिला बळी ठरला. त्यानंतर चाकण पोलीस ठाण्यातील अंबरनाथ कोकणे यांचा करोनाने मृत्यू झाला. तर चिंचवड पोलीस ठाण्यातील रमेश लोहकरे यांचा तिसरा बळी करोनाने घेतला.

लढा सुरुच
करोनामुळे तयार करण्यात आलेले नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचा लढा अजूनही सुरुच आहे. सर्व पोलीस करोनामुक्‍त झालेले असतानाच आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे पुढे आले. यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना या आजारापासून वाचवायचे आणि या आजाराला जनतेत पसरु देण्यापासून रोखायचे अशा दोन्ही मोर्चांवर पोलिसांचा लढा सुरुच आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.