लक्षवेधी : तेलंगणा भाजपचे नवे लक्ष्य!

-राहुल गोखले

विद्यमान भाजप नेतृत्वाची धारणा ही सत्तेच्या बाबतीत “खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख’, अशी झाल्याने नवनवे प्रदेश पादाक्रांत करण्यावर भाजपचा भर आहे. तेलंगणा हे त्यातील नवे इप्सित. डुब्बाक मतदारसंघातील विजयाने भाजपला तेलंगणा लक्ष्य करण्याचा आत्मविश्‍वास दिला आहे हे निश्‍चित.

निवडणूक कोणतीही असो भारतीय जनता पक्ष तेथे जोरदार तयारीला लागतो, हे चित्र आता नवे राहिलेले नाही. कॉंग्रेस आणि भाजपमध्ये हाच प्रमुख फरक आहे. निवडणूक जाहीर होवो, निकाल लागोत, त्यात आपल्या पक्षाला नामुष्कीजनक पराभव माथी येवो, कॉंग्रेस नेतृत्वाची शांतता थोडीही ढळत नाही. किंबहुना जे कोणी कॉंग्रेसच्या सुमार कामगिरीचे अंतर्गत विश्‍लेषण करू पाहतात अशांना गप्प केले जाते आणि त्यापुढे जाऊन कॉंग्रेसचे धोरण आणि नेतृत्व पसंत नसेल, तर पक्षातून बाहेर पडावे, असे थेट सल्ले दिले जातात. भाजप नेतृत्व मात्र सतत पुढच्या निवडणुकीची व्यूहरचना आखण्यात मग्न असते. निवडणुका अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असल्या तरीही तेथे भाजप गांभीर्याने रणनीती आखतो.

याचा एकच ताजा पुरावा म्हणजे हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांसाठी भूपेंद्र यादव यांची पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून करण्यात आलेली नियुक्‍ती. हेच यादव आताच बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांत देखील भाजपचे प्रभारी होते. तेव्हा तेथील भाजपची कामगिरी पाहता यादव यांच्यात उत्साह आणि आत्मविश्‍वास दुणावलेला असल्यास नवल नाही. यादवही हैदराबादमध्ये लगेच कामाला लागले आहेत आणि केवळ हैदराबाद महानगरपालिकेतच नव्हे, तर तीन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांतही भाजपच विजयी होईल अशी गर्जना केली आहे. पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू याबरोबरच भाजपचे लक्ष्य आता तेलंगणा आहे हे त्यामुळे निश्‍चित झाले आहे. तथापि, भाजपला खरोखरच एवढे यश मिळेल का, हे लवकरच कळेल कारण हैदराबाद महानगरपालिकेसाठी येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 4 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

तेलंगणात भाजप हा कधीच लक्षवेधी पक्ष नव्हता. तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) आणि कॉंग्रेस यांच्यात प्रामुख्याने तेथे लढत असे. मात्र इतरत्र होत आहे तशीच कॉंग्रेसची पडझड तेलंगणातही झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसचे 19 पैकी 12 आमदार टीआरएसमध्ये सामील झाले. साहजिकच विरोधी पक्षाचा अवकाश भाजपसाठी खुला झाला आणि आता टीआरएसला पर्याय म्हणून
स्वतःची प्रतिमा तयार करण्याच्या कामाला पक्षनेते लागले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तेलंगणात तब्बल चार जागा जिंकता आल्या.

अर्थात त्याचे एवढेच महत्त्व नाही. ज्या जागा भाजपने जिंकल्या त्यातील निझामाबाद मतदारसंघ 2009 मध्ये कॉंग्रेसने जिंकला होता तर 2014 च्या निवडणुकीत टीआरएसने. मात्र 2019 च्या निवडणुकीत भाजपने तो आपल्याकडे खेचून आणला आणि तेही तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्येचा पराभव करीत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने 88 जागांवर विजय मिळविला होता तर भाजपने अवघी एक जागा जिंकली होती. तेव्हा इतक्‍या अल्प बळावर आता भाजपने 2023 च्या निवडणुकांत विधानसभेवर आपला झेंडा फडकविण्याच्या वल्गना कराव्यात हे म्हटले तर अजब तर्कशास्त्र. पण कॉंग्रेसचा आक्रसता जनाधार आणि अलीकडेच डुब्बाक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला विजय यामुळे भाजप नेतृत्वाचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. चंचूप्रवेश करीत आपला विस्तार कसा करायचा याची व्यूहरचना हेच भाजपचे निवडणूक लढविण्याचे तंत्र अलीकडच्या काळात राहिले आहे.

वास्तविक डुब्बाक हाच मतदारसंघ नव्हे तर त्याभोवतीचे देखील मतदारसंघ हे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या प्राबल्याचे मानले जातात. 2018 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून टीआरएस उमेदवार तब्बल 62 हजारांच्या मताधिक्‍याने निवडून आला होता. तेव्हा आताच्या पोटनिवडणुकीत देखील टीआरएसचा विजय सहज होईल आणि त्या पक्षाची लढत ही कॉंग्रेसशी असेल असेच सार्वत्रिक गृहीतक होते. मात्र, या लढतीत भाजपने बाजी मारली आणि जरी मताधिक्‍क्‍य अगदी कमी असले तरी टीआरएसला त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करून दाखविले. शिवाय भाजपला मिळालेल्या मतांची टक्‍केवारी गेल्या वेळच्या तुलनेत 21 टक्‍क्‍यांनी वधारली आहे. यामुळे टीआरएसला धक्‍का बसणे स्वाभाविक आहे आणि याच निमित्ताने टीआरएसच्या राजवटीवर शरसंधान करण्याची संधी भाजपला मिळणार आहे. भाजपने चंद्रशेखर राव यांच्या सरकारवर सडकून टीका करण्यास प्रारंभ केला आहेच. त्यातच टीआरएस आणि ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षांत असणाऱ्या राजकीय समझोत्यामुळे भाजपला टीआरएस हा पक्ष अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करीत असल्याचा आरोप करण्याची संधीही मिळणार आहे.

भाजपने आतापासूनच आपण हिंदूंच्या हिताचे राजकारण करणार याचे सूतोवाच केले आहे. याचा परिणाम टीआरएसच्या राजकीय वाटचालीवर होऊ शकतो. किंबहुना भाजपच्या याच रणनीतीचा बहुधा धसका घेऊन टीआरएसने हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत आपण सर्व दीडशे जागा लढविणार असून एआयएमआयएमशी जागावाटप करणार नाही असे जाहीर केले आहे. ओवेसी यांच्या पक्षाशी टीआरएसचे मैत्रीपूर्ण संबंध नाहीत हे भासविण्याचा हा प्रयत्न म्हणजेच भाजपच्या सरशीचा धोका टीआरएसने ओळखला आहे याचा पुरावा म्हटला पाहिजे. तेव्हा भाजपने आपण हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुमत मिळवू आणि कालांतराने विधानसभेतदेखील आपला झेंडा फडकावू अशी वल्गना केली असली तरी लगेचच भाजप एवढी मुसंडी मारू शकेल असे मानणे गैर आहे. तथापि तेलंगणात आता भाजप पूर्ण जोर लावणार हे यातून पुरेसे स्पष्ट होते.

प. बंगालमध्ये मिळणारा वाढता प्रतिसाद, बिहारमध्ये घेतलेली झेप हे पाहता तेलंगणात भाजप गांभीर्याने संघटन आणि रणनीतीचा उपयोग करेल. दक्षिण भारतात भाजपचा प्रभाव मर्यादित आहे. कर्नाटकात जरी भाजपला सत्ता मिळाली असली तरीही आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ हे भाजपसाठी मोठे आव्हान कायम राहिले आहे. तेव्हा आपला विस्तार दक्षिण भारतात व्हावा अशी भाजप नेतृत्वाची इच्छा असल्यास नवल नाही. तेलंगणा ही अशा विस्तारासाठी सुपीक भूमी आहे असा भाजपचा कयास असावा. अलीकडच्या पावसाळ्यात हैदराबादसारख्या आयटी शहरात देखील काय दैना झाली होती याची दृश्‍ये सर्वांनीच पाहिली आहेत. तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या अशाच उणिवांवर बोट ठेवत त्याबरोबरच हिंदू मतपेढीला साद घालत भाजप तेलंगणात आपला प्रभाव वाढवित राहणार यात शंका नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.