- 846 नवीन बाधित
- 59 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख उतरणीला लागला आहे. शहरात नवीन बाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज शहरात 2067 रुग्ण करोनामुक्त झाले तर नवीन 846 नवीन रुग्णांची भर पडली. तर 59 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सोमवारी (दि. 17) शहरात 846 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 42 हजार 580 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 59 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 43 व शहराबाहेरील 14 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 5592 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
दिवसभरामध्ये 2067 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 22 हजार 326 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 6609 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 5079 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 482 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 16 हजार 561 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात निम्म्याहून अधिक रुग्णांची प्रकृती चिंताजनक
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात सध्या 70 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील निम्म्याहून आधिक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात नव्याने 9 बाधित रुग्ण आढळले आहेत. पुणे, पिंपळे निलख, पिरंगुट, बोपोडी, चिंचवडगाव, बाणेर, काळेवाडी येथील रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. 7 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. कात्रज, पिंपळे गुरव, विशालनगर, वाकड, नवी सांगवी, विश्रांतवाडी येथील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. रुग्णालयात सध्या 70 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 52 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 274 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 348 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 1 हजार 998 रुग्ण सध्या गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.