“पीएफ’मधून अनिवार्य परताव्याशिवाय आगाऊ रक्कम मिळणार 

नवी दिल्ली – देशातील भविष्य निर्वाह निधी योजनेचे सदस्य असलेल्या सर्व कामगारांना कोविड-19 या जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी अनिवार्य परताव्याशिवाय भविष्य निर्वाह निधीतून आगाऊ रक्कम मिळण्याची सोय करून देणारी नवी सुधारणा कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जारी केली आहे. त्याकरिता कामगार भविष्य निर्वाह निधीमध्ये आवश्‍यक सुधारणा करणारी अधिसूचना नुकतीच मंत्रालयाने जारी केली.

देशभरातील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि कामगार भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या सर्व कामगारांसाठी ही सुधारणा कालपासून लागू झाली आहे. नव्या सुधारणेनुसार तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांची एकत्रित रक्कम किंवा कामगाराच्या खात्यात एकूण जमा निधीच्या 75% पर्यंत यापैकी एक रक्कम त्या कामगाराला मिळू शकेल आणि ही रक्कम परत करणे अनिवार्य नसेल.

कामगार मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केल्यानंतर, यासंदर्भात सदस्यांकडून आलेल्या अर्जांवर तातडीने योग्य कारवाई करण्याचे आदेश कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालयांना दिले आहेत.

कोविड-19 महामारीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी सदस्यांच्या आगाऊ रक्कमेची मागणी करणाऱ्या अर्जांवर तातडीने पुढील प्रक्रिया सुरु करावी आणि सदस्य कामगार आणि त्याचे कुटुंब यांना दिलासा द्यावा, असे निर्देश संघटनेने सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला पाठविलेल्या सूचनेत दिले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.