नवी दिल्ली- मनि लॉंड्रिग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले रॉबर्ट वढेरा यांना विदेशात जाण्यास दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने अनुमती दिली आहे. त्यांना अमेरिका आणि नेदरलॅंड मध्ये सहा आठवड्यांसाठी जायचे आहे, त्याविषयीची माहिती त्यांनी न्यायालयात सादर केल्यानंतर त्यांना तिकडे जाण्यास अनुमती देण्यात आली आहे.
तथापी त्यांनी लंडन मध्ये जाऊ नये असे त्यांना न्यायालयाने बजावले आहे. त्यांच्या लंडन येथील मालमत्तेविषयीच सध्या चौकशी सुरू असल्याने न्यायालयाने त्यांना हा आदेश दिला आहे. प्रकृतीच्या कारणासाठी वढेरा यांनी लंडन सह अन्य देशांमध्ये जाण्याची अनुमती मागितली असल्याने त्यांना ती अनुमती देऊ नये असा विरोध ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केला. पण न्यायालयाने त्यांना लंडन सोडून अन्यत्र जाण्यास अनुमती दिली आहे.