मुंबई – डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएम ब्रॅंडची मालकी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडची नुकतीच 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर ही पहिली वार्षिक सभा झाली आहे. या सभेत विजय शेखर शर्मा यांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून फेरनियुक्तीसह सात ठराव 94 टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी संमत करण्यात आले.
यापूर्वी मे 2022 मध्ये, वन 97 कम्युनिकेशन्सच्या संचालक मंडळाने विजय शेखर शर्मा यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली होती. भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने फेब्रुवारी 2022मध्ये, भारतीय कंपन्यांसाठी स्वतंत्र अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असणे ऐच्छिक केले आहे.