पुणे – राज्यातील विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा 1 तारखेला अदा होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक व प्राचार्य यांना जबाबदार धरुन नियमाप्रमाणे कारवाई होणार आहे. याबाबतचे आदेश उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी दिले.
वेतन अदा केल्यानंतर दरमहा 5 तारखेपर्यंत कार्यालयाच्या वेबसाइटवर महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध व्हावी. तसेच वेतन प्रलंबित राहिल्याबद्दलची कारणांसह यादीही प्रसिद्ध करावी. त्याबाबतचा अहवालही उच्च शिक्षण संचालनालयास सादर करणे बंधनकारक आहे.
विभागीय सहसंचालकांकडून वेळेत वेतन अदा करण्यात येते. परंतु, संबंधित महाविद्यालयांकडून शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात ते वेळेत अदा होत नसल्याची बाब निदर्शनास आली. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
काही महाविद्यालयांचे बॅंकेतील वेतनाचे खाते संयुक्त असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यास विलंब होत असल्याचे आढळून आले. शासनाकडून प्राप्त झालेले वेतन अनुदान वेळेत विभागीय सहसंचालकांना वितरीत होते. त्यानंतर विभागीय सहसंचालकांकडून ते महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या खात्यावर अदा करण्यात येते. वेळेत वेतन देण्याबाबत विविध स्तरावर योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक आहे.