नवी दिल्ली – ट्विटरने भारतासह अनेक देशांत सशुल्क ब्लू टिक सेवा देण्याचे जाहीर केल्यानंतर आता “मेटा’ने देखील सशुल्क ब्लू टिक सेवेला प्रारंभ केला आहे. त्यामुळे आता फेसबुक आणि इंस्टाग्रामचे वापरकर्ते देखील पैसे देऊन त्यांचे खाते सत्यापित(व्हेरीफाईड) करू शकतील. महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी ही सेवा कंपनीने ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता केल्यानंतर मोफत देण्यात येत होती. सद्या ही सेवा न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया जाहीर करण्यात आली असून लवकरच भारतातही तिची घोषणा होणार आहे.
फेसबुक आणि इंस्टाग्रामने प्रथम ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सशुल्क सदस्यता सुरू केली आहे. त्यानुसार या देशांतील वापरकर्त्यांना वेब आवृत्तीसाठी 11.99 डॉलर (सुमारे 990 रुपये) आणि “आयओएस’ आणि अँड्रोईड मोबाइल प्लॅटफॉर्मसाठी प्रति महिना 14.99 (सुमारे 1,240 रुपये) मोजावे लागतील. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी वापरकर्त्यांना सरकारी ओळखपत्र देखील द्यावे लागेल. याशिवाय पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांना थेट ग्राहक सपोर्ट मिळेल ज्यामुळे त्यांना आपला “रिच’ वाढविण्यास मदत होईल.
“सिडनीतील काही वापरकर्त्यांकडून ही सेवा वापरण्यात समस्या आल्याची तक्रार असली तरी, ती सोडविण्यात आली असून फेसबुक आणि इंस्टाग्रामची सशुल्क व्हेरिफिकेशन सेवा येत्या सात दिवसांत जागतिक स्तरावर सुरू केली जाईल. या सेवेमुळे मेटाच्या महसुलात मोठी वाढ होऊ शकते, असे मेटाच्या प्रवक्ताने यावेळी म्हटले आहे.
ट्विटरची ब्लू टिक सेवा सुरु –
मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने नुकतीच पेड सबस्क्रिप्शन सेवा ट्विटर ब्लू भारतात लॉंच केलेली आहे. त्यानुसार भारतातील मोबाईल वापरकर्त्यांना ब्लू टिक मिळवण्यासाठी आणि प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवेची वैशिष्ट्ये वापरण्यासाठी दरमहा 900 रुपये मोजावे लागतात. ट्विटरने ही सुविधा भारतासह यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपान या देशांत सुरु केलेली आहे. काही देशांमध्ये लॉन्च करण्यात आले होते.