पुणे – शहरात महापालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या “पे अँड पार्क’मधील दर वाढण्याचे संकेत मिळत आहेत. ठेकेदारांनी दरवाढीबाबत पालिकेकडे मागणी केली होती.
करोना काळात तोटा सहन करावा लागल्याने तसेच पालिकेकडून घेण्यात येणारे जागेचे भाडे परवडत नसल्याने दरवाढीची मागणी करण्यात आली होती. परिणामी आगामी काळात पुणेकरांच्या खिशाला भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.
सारसबागेसमोर, बालगंधर्व आदी ठिकाणच्या पार्किंगसाठी कंत्राटदार नेमले आहेत. मात्र पालिकेकडून घेण्यात येणारे जागा शुल्कच अधिक असल्याची ओरड सुरू होती. बालगंधर्वमधील पार्किंग ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार पालिकेकडून दर महिना पन्नास हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते.
परंतु, करोना पार्श्वभूमीवर महिना जेमतेम 30 हजार रुपयेच मिळतात. दरम्यान, लॉकडाऊन काळातील भाडे पालिकेने संपूर्णपणे माफ करावे, अशी मागणीही कंत्राटदारांकडून करण्यात आली आहे. येत्या काळात दुचाकींकरिता ताशी 5 रुपये व चारचाकींकरिता ताशी 15 रुपयांचे शुल्क आकारण्यात येऊ शकते, अशी माहिती पालिकेतील सूत्रांकडून देण्यात आली.