पुणे : शहरात अनेक गंभीर रूग्णांना रूग्णालयात व्हेंटीलेटर बेड असूनही अनेक हॉस्पीटल उपचार नाकारत आहेत. त्यामुळे खासगी हॉस्पीटल लाखो रूपये घेऊन हे बेड रिक्त ठेवले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब लक्षात घेऊन तातडीनं शहरातील एकूण उपलब्ध असलेल्या व्हेंटीलेटरवरील रूग्णांची यादी, तसेच प्रतिक्षाधीन रूग्णांची यादी तयार करून ती जाहीर करून रोज अपडेट करावी अशी मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
शहरात गेल्या काही दिवसात गंभीर रूग्णांचा आकडा मोठया प्रमाणात वाढला आहे, विशेषत: 30 ते 40 वयाच्या आतील अनेकांना आयसीयू तसेच व्हेंटीलेटरची गरज भासत आहे. अशा स्थितीत अनेक हॉस्पीटल व्हेंटीलेटर नसल्याचे सांगत आहेत. तर अनेक धनदांडग्याकडून जवळ पैसे असल्याने आधीच हॉस्पीटलला लाखो रूपये मोजून बेड तसेच व्हेंटीलेटरही बुक करून रिकामे ठेवल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत अनेक कुटूंबातील कर्त्या व्यक्तींचे उपचार न मिळाल्याने निधन होत असून कुटूंब उधवस्त होत आहेत.
ही बाब लक्षात घेऊन ज्या प्रमाणे बेडसाठी हेल्पलाईन क्रमांक आहेत त्याच प्रमाणे व्हेंटीलेटरसाठीही हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा त्या सोबतच हॉस्पीटलमधील व्हेंटीलेटरवर असलेल्या रूग्णांची तसेच हेल्पलाईनवर व्हेंटीलेटरची नोंदणी केलेल्या रूग्णांची प्रतिक्षा यादी जाहीर करून ती रोज अपडेट करावी अशी मागणी कनोजिया यांनी केली आहे. तर अनेक ठिकाणी या आजारात आता भावनिक विचार न करता आणि 25 ते 40 वयोगटातील वाढलेली मृतांची संख्या लक्षात घेता, व्हेंटीलेटरवर किती वयाच्या रूग्णांवर उपचार करावेत याचाही प्रोटोकॉल निश्चित करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.