पुणे – भव्य रांगोळीची आरास, आकर्षक फुलांची सजावट, हजारो पणत्यांचा लखलखाट असे वातावरण सोमवारी शहरातील विविध मंदिरांत पाहायला मिळाले. निमित्त होते, त्रिपुरी पौर्णिमेचे.
त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून शहराच्या विविध भागांतील मंदिरात फुलांची आरास केली होती. तर, अनेक ठिकाणी पणत्या प्रज्वलित केल्या होत्या. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा घरोघरी, मंदिरांमध्ये दिवे लावतात.
पाताळेश्वर मंदिर सेवा समितीच्या वतीने पाताळेश्वर मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी तब्बल 20 हजार दिवे प्रज्वलित केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सैन्य दलातील निवृत्त अधिकारी कर्नल बिपीन शिंदे यांच्या हस्ते दीपोत्सवाचा शुभारंभ झाला. यावेळी अध्यात्मिक क्षेत्रातील रघुनाथ येमुल, वीरपत्नी कल्याणी भागवत आदी उपस्थित होते.
दत्तमंदिरात 151 पदार्थांचा अन्नकोट
विविध प्रकारची मिठाई, फळे, खाद्यपदार्थ, चॉकलेट, बिस्किटे, लाडू, जिलेबी, पेढे, काजूकतली अशा सुमारे 151 पदार्थांचा अन्नकोट दत्त महाराजांसमोर मांडण्यात आला. कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नकोट आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. मंदिराच्या प्रवेशद्वारात आकर्षक रांगोळी काढण्यात आली. तसेच, गाभारा फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता. दत्त मंदिरातील अन्नकोटामध्ये ठेवलेले पदार्थ ट्रस्टतर्फे तसेच भाविकांनी दिलेल्या पदार्थांमधून मांडण्यात आले. मंदिरात फुलांची आकर्षक सजावटदेखील केली होती.