आता आरपारची लढाई! शेतकरी नेत्यांचा ठाम निर्धार; आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

नवी दिल्ली – आम्ही आमच्या मागण्यांसाठी आरपारच्या किंवा निर्णायक लढ्यासाठी दिल्लीला आलो आहोत. आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी सोमवारी स्पष्ट केले. भर थंडीत पाचव्या दिवशी हे आंदोलन राजधानीच्या सीमेवर सुरूच होते.

हे आंदोलन दडपण्याचा हे सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचा आरोप करून शेतकरी नेते गुरनामसिंग चादोनी म्हणाले, आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमची निदर्शने सुरूच राहतील. आम्ही दिल्लीला निर्णायक लढ्यासाठी आलो आहोत. हे आंदोलन चिरडण्यासाठी आमच्यावर आतापर्यंत 31 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारती किसान संघाचे सरचिटणीस जगमोहनसिंग म्हणाले, सर्व राज्यातील शेतकरी संघटनांशी आमचा अद्याप बैठक झाली नाही. आम्ही सध्या पंजाबमधील 30 शेतकरी संघटना आंदोलनात उतरलो आहोत. मोदीजींनी पाठवलेले सशर्त निमंत्रण आम्ही फेटाळत आहोत. दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या सीमेवर कॉंक्रिटची बॅरीकेड उभारली आहेत. तेथे मोठ्या संख्येने निदर्शक जमा होत आहेत. तर दिल्ली हरियाणा सीमेवर हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत.

राष्ट्रीय राजधानीला जोडणारे सर्व मार्ग रोखून धरण्याचा इशारा दिल्यानंतर तेथील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गेल्या दिवसांपासून टिकरी आणि सिंघू सीमेवर शांततापूर्ण निदर्शने सुरू आहेत. तेथे कोणत्याही अनुचित घटनेची नोंद नाही.

गझियापूर सीमेवर शेतकऱ्यांच्या संख्येत अचानक लक्षणीय वाढ झाली आहे. तेथे आणखी काहीशे शेतकरी येत्या काही तासांत दाखल होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी बुरारी मैदानावर दाखल व्हावे त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, हे केंद्र सरकारचे आवाहन शेतकऱ्यांनी फेटाळून लावले आहे.

बुरारी येथील निरंकारी मैदानावर दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी आपली निदर्शने सुरूच ठेवली आहेत. गझीयापूर सीमेवरील स्थिती अद्याप नियंत्रणाखाली असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. देशाच्या राजधानीत घुसण्यापासून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तेथे कॉंक्रिटचे बॅरिकेडस्‌ लावण्यात आले अहोत. निदर्शकांना बुरारी मैदानावर जायचे नाही. त्यांना जंतर मंतरवर निदर्शने करायची आहेत. मात्र दिल्ली गझीयाबाद सीमा सील केलेली नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
आम्हाला निदर्शने करण्यासाठी बुरारी मैदानावर जायचे नाही. येथे आंदोलन करण्यासाठी किमान सहा महिने पुरेल एवढा अन्न धान्याचा साठा आम्ही करून ठेवला आहे. आम्ही येथून जाऊ तर केवळ जंतर मंतरवर जाऊ. आम्ही अन्यत्र कोठेही निदर्शने करणार नाही, असे गेले पाच दिवस आंदोलन करणाऱ्या सुखविंदरसिंग यांनी सांगितले.

सिंघू सीमेवर खासगी डॉक्‍टरांचे पथक शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यसाठी दाखल झाले आहे. आम्ही शेतकऱ्यांना आमच्या पातळीवर मदत करत आहोत. त्यांना लागू शकणाऱ्या औषधांचा साठा आम्ही आणला आहे, असे या पथकातील एक डॉक्‍टर सारिका वर्मा यांनी सांगितले.

सिंघू आणि टीकरी सीमा बंद असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. मुकरबा चौकातून आणि जीटीके रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. सिग्नेचर पूल ते रोहिणी या आणि परत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.