पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी धरणाचे दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले होते.
मात्र सोमवारी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 6 वक्र दरवाजे पाच फुटांपर्यंत उघडून धरणातून कोयना नदी पात्रात 45 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, धरण व्यवस्थापनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
105.25 टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा 104.60 टीएमसी झाला असून पाणी पातळी 2163 फूट एवढी झाली आहे.
धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. सध्या कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान ही वाढले आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय घेतला.