खटाव तालुक्यातील येलमरवाडीत अनैतिक संबंधाला अडथळा ठरल्याने वृद्धेचा खून

वडूज  -शरीरसंबंधाला अडथळा ठरल्याने हिराबाई दगडू जगताप (वय 70) या निराधार वृद्धेचा डोक्‍यात मारहाण करून, खून केल्याची घटना येलमरवाडी (ता. खटाव) येथे काल (दि. 12) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी गौतम कृष्णा नलवडे (रा. येलमरवाडी) यांच्या फिर्यादीवरून एक महिला व तुळशीराम सखाराम बागल (वय 49, रा. येलमरवाडी) यांना वडूज पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, हिराबाई या गावातील बाळकृष्ण पोळ यांच्या घरासमोर रविवारी (दि. 12) रात्री साडेनऊच्या सुमारास पडलेल्या काही लोकांना दिसल्या. बराच वेळ झाला तरी त्या जागच्या हलत नसल्याने स्थानिकांनी जवळ जाऊन पाहिले असता, त्यांच्या डोक्‍यातून रक्त वाहत होते. हिराबाई यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती हिराबाई यांचा भाचा गौतम नलवडे यांना कळवली.

नलवडे यांनी घटनास्थळी येऊन मावशीचा मृतदेह ओळखून वडूज पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडूज ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेबाबत पोलिसांनी गावात चौकशी केली.

हिराबाई या गावात भिक्षा मागून खात असल्याने, त्यांचे कोणाशी वैर असण्याची शक्‍यता नव्हती. त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान होते. पोलिसांचे एक पथक तक्रार दाखल करून घेत होते, तर दुसरे पथक येलमरवाडीत तळ ठोकून होते. संशयित बागल हा पोलिसांच्या तपासाबाबत माहिती घेत होता.

ही गोष्ट सपोनि देशमुख यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. त्यांनी संशयावरून बागल याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे प्रेयसी हिच्याशी शारीरिक संबंध सुरू असताना हिराबाई यांनी भिक्षा मागण्यासाठी दरवाजा वारंवार ठोठावला. त्यामुळे रागाच्या भरात त्यांच्या डोक्‍यात दांडके मारल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी दोघांना सोमवारी सायंकाळी अटक केली.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मालोजीराव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.