नवी दिल्ली – संसदेचे सुरक्षा कवच भेदले जाण्याच्या प्रकरणातील सध्या कैदेत असलेली आरोपी नीलम आझाद हिच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आपल्याला दिल्ली पोलिसांच्या कोठडीत अवैधरित्या ठेवण्यात आले असून आपल्या पसंतीचा वकिल निवडण्याची मुभा दिली जात नसल्याचा आरोप करत तिने याचिका दाखल केली आहे. मात्र सुनावणीसाठी सूचित तिच्या याचिकेचा समावेश करण्यात आलेला नाही.
नीलमच्या विषयावर ३ जानेवारी रोजी सुनावणी होईल. त्याची घाई करण्याचे कोणते कारण दिसत नाही असे न्या. नीना बन्सल कृष्ण आणि न्या. शैलिंदर कौर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. तिच्या वकिलांनी सांगितले की तिची कोठडीची मुदत ५जानेवारी रोजी संपते आहे आणि तिने कोठडीतूनच ही याचिका दाखल केली आहे. तथापि, सुनावणीला अजूनही पुरेसा वेळ असल्याचे नमूद करत न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली.