मुंबई – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. बदली झाल्यानंतर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे परमबीर सिंग यांचं भाजपशी साटंलोटं असल्याचे आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आले. त्यात आता परमबीर सिंग यांचं भाजप कनेक्शन समोर आलं आहे.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा आरोप सिंग यांनी केला होता. त्यावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपकडून गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. भाजपच्या मागणीवर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे. फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतरच परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणं शंका उपस्थित करणार असल्याचं महाविकास आघाडीतील नेत्यांचं म्हणण आहे.
दरम्यान परमबीर सिंग यांचे भाजपनेत्याशी असलेले कौटुंबिक संबंध आता समोर आले आहेत. परमबीर सिंग यांचा मुलगा रोहन सिंग याचे लग्न भाजपचे नेते सागर मेघे यांची कन्या राधिका हिच्याशी झाले आहे. सागर मेघे हे दत्ता मेघे यांचे सुपुत्र आहे. काँग्रेसमध्ये ३६ वर्षे राहिल्यानंतर दत्ता मेघे यांच्या कुटुंबाने २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. दत्ता मेघे यांचे चिरंजीव दुसरे चिरंजीव समीर मेघे सध्या भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत.