सोलापूर – ‘विठ्ठल मंदिर खुलं करा,’ या मागणीसाठी पंढरपुरातील आंदोलनाप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत 31 ऑगस्ट रोजी पंढरपुरात आंदोलन केले होते. . जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात करोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन प्रतिबंधात्मक आदेश असताना प्रकाश आंबेडकर यांनी 1100 ते 1200 लोकांचा जमाव जमवला.
यावेळी मास्क घातला नाही तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. संचारबंदी व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमामधील तरतुदीचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन घोषणाबाजी केली.
यामुळे वंचितांचे नेते प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, रेखाताई ठाकूर, हभप नामद महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, गणेश महाराज शेटे आणि माऊली हळणवर या नेत्यांसह 1100 ते 1200 आंदोलकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.