पुण्यात करोनाचा कहर काही केल्या थांबेना

पुणे – शहरात बुधवारी  नव्याने 1 हजार 627 कराेना बाधित सापडले आहेत. तर 1 हजार 408 बाधित करोनामुक्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी तपासणी अहवालाची संख्या कमी असल्यामुळे बाधित संख्या 876 पर्यंत खाली आली होती. 

मात्र, सलग दोन दिवसांपासून बाधित संख्या पुन्हा सतराशेपर्यंत पोहचली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात करोनामुळे 43 बाधितांचा मृत्यु झाला असून, शहरातील मृतांची संख्या 2 हजार 375 वर पोहचली आहे.

पुणे शहरातील बाधित संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर आली आहे. 2 ऑगस्टपासून बाधित संख्या कमी झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला. 31 ऑगस्ट अखेरपर्यंत बाधितांची संख्या दोन लाखांच्या पुढे जाईल अशी शक्यता पुणे महापालिकेकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या अहवालात नमूद केले होते. मात्र, आज बाधित संख्या 98 हजार 695 इतकी असून, सुदैवाने ही शक्यता खोटी ठरली यातच मोठे समाधान आहे.

शहरातील वाढती गर्दी, नियमांचे पालन न करणे यामुळे पाच दिवसांपासून शहरात पुन्हा बाधित संख्या वाढू लागली आहे. बुधवारी दिवसभरात 6 हजार 215 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. तर आज 1 हजार 408 बाधित बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 80 हजार 897 जण बरे होवून घरी गेले आहेत. सद्यस्थितीत शहरातील विविध रूग्णालयात 15 हजार 423 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.