पुणे – कॅडेलिया क्रुझ पार्टी दरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सोबत सेल्फी घेणारा आणि पुणे पोलिसांनी फरार घोषीत केलेला आरोपी किरण गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार आहे. त्याने एका वृत्त वाहिनिशी बोलताना ही माहिती दिली. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी गोसावीने आमच्याशी संपर्क साधला नसून आमची पथके त्याचा कसून माग घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
गोसावीने वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, आपण महाराष्ट्र पोलिसांना शरण येणार नसून महाराष्ट्राबाहेर शरण येणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर एका मागो माग एक आरोपांचे सत्र सुरु केले आहे. यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईलने एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर जाहिरपणे गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. आर्यन खान केसवरुन राजकीय पक्षांमध्ये चिखलफेक सुरु झाली आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पथके गोसावीचा शोध घेत असल्याचे सांगितले. तसेच त्याने वृत्तवाहिनिशी कोठून संवाद साधला हे माहित नसल्याचे स्पष्ट केले.
“गोसावीचा शोध फरासखाना पोलीस आणी गुन्हे शाखेची पथके घेत आहेत. त्याचा ठाव ठिकाणा शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत” – अमिताभ गुप्ता (पोलिस आयुक्त पुणे शहर)