मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आपले अधीक्षक विश्व विजय सिंह यांची हकालपट्टी केली आहे. 2021 मध्ये कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकणाऱ्या टीमचा तो भाग होता. या छाप्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. अधिका-यांनी मंगळवारी सांगितले की, विश्व विजय सिंह यांना दुस-या एका प्रकरणात गैरवर्तनासाठी निलंबित करण्यात आले आहे. याचा आर्यन खान प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार,विश्व विजय सिंह यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश गेल्या महिन्यात जारी करण्यात आला होता. सिंग हा त्या टीमचा भाग होते ज्याने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला आणि आर्यन खानसह इतरांना ऑक्टोबर 2021 मध्ये ड्रग्स प्रकरणात अटक केली. मात्र त्यांना दुसऱ्याच एका प्रकरणात सेवेतून काढून टाकण्यात आले असल्याचे समजते.
अधिकाऱ्याने सांगितले की, विश्व विजय सिंह यांना गेल्या वर्षी एनसीबीच्या सेवेतून दुसऱ्या एका प्रकरणात काढून टाकण्यात आले होते आणि त्यांच्याविरोधात चौकशी सुरू होती. ते म्हणाले की, एनसीबीला तपासादरम्यान गैरवर्तणुकीचे काही मुद्दे आढळून आले, त्यानंतर सिंग यांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
एनसीबीचे तत्कालीन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथील कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये आर्यन खान आणि इतरांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सुरुवातीला अंमली पदार्थ सेवन आणि तस्करीचे आरोप ठेवण्यात आले होते. 22 दिवस तुरुंगात घालवलेल्या आर्यन खानला एनसीबीने मे 2022 मध्ये ‘पुरेशा पुराव्याअभावी’ क्लीन चिट दिली होती.
मनमानी केल्याच्या आरोपामुळे एनसीबी टीम आणि वानखेडे यांच्याविरुद्ध वेगळी दक्षता चौकशी सुरू करण्यात आली होती. कथित ‘ड्रग्ज ऑन क्रूझ’ प्रकरणात सात अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, आयआरएस अधिकारी वानखेडे यांची नंतर चेन्नई येथील डीजी टॅक्सपेअर सर्व्हिसेस डायरेक्टरेटमध्ये बदली करण्यात आली.