Allu Arjun | Andhra Pradesh : साऊथ फिल्म्सचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने म्हणजेच ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. अल्लू अर्जुनच्या चित्रपटांचे लाखो चाहते प्रेमात पडले आहेत.
चित्रपटातील त्यांचे उत्कट संवाद, उत्कृष्ट अभिनय आणि अप्रतिम नृत्य पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. पुष्पा सिनेमातील अल्लू अर्जुन हे अॅक्शन, ड्रामा, डान्स आणि कॉमेडीचे संपूर्ण पॅकेज आहे. अल्लू अर्जुन सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.
त्याची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोक जमतात. अश्यातच, अभिनेता शनिवारी, 11 मे रोजी नंदयाल येथे वायएसआर काँग्रेसचे उमेदवार रवी चंद्र किशोर रेड्डी यांच्या प्रचारात सामील झाला होता. तेथे जमावाने त्याला घेरले. कशीतरी त्याची अंगरक्षकांनी सुखरूप सुटका केली आणि एका घराच्या बाल्कनीत नेले. जिथून अभिनेत्याने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अभिनेता हजारो लोकांमध्ये अडकला होता. प्रत्येकजण त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्याच्याकडे जात होता. तर काहींना फक्त त्याला जवळून पाहण्याची इच्छा होती. अभिनेता अल्लू अर्जुन हा त्याचा मित्र रविचंद्र किशोर रेड्डी यांना पाठिंबा देण्यासाठी नंदयाल येथे पोहोचला होता.
Andhra Pradesh: Global star Allu Arjun sparks enthusiasm in Nandyal in support of YSRCP party leader Shilpa Ravi Chandra Kishore Reddy pic.twitter.com/MZIXfYN381
— IANS (@ians_india) May 11, 2024
मात्र, आता अभिनेता अल्लू अर्जुनला मित्रासाठी प्रचार करणे चांगलेच महागात पडले आहे. नांदयालचे तहसीलदारांनी शहरातील पोलीस ठाण्यात अल्लू अर्जुनच्या विरोधात तक्रार दाखल केली. अल्लु अर्जुनने निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिरवणूक काढणे किंवा निवडणुकीचा प्रचार करण्याची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.
तसेच त्याने उमेदवाराच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी अल्लू अर्जुनच्या विरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तसेच अल्लू अर्जुनने चार पेक्षा अधिक लोक जमा करून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 चेही उल्लंघन केले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच आंध्रप्रदेश पोलीस कायद्याच्या कलम 31 नुसारही त्याला दोषी मानन्यात आले आहे.
अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट –
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द रुल’ 15 ऑगस्टला रिलीज होणार असून चाहते त्याची वाट पाहत आहेत. या चित्रपटात फहद फासिल, रश्मिका मंदान्ना, धनंजय, राव रमेश आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटाच्या अल्बमचे पहिले गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले असून ते मिका सिंगने गायले आहे. सध्या सगळीकडे याच चित्रपटाचा हवा पाहायला मिळत आहे.