इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाचा फैसला उद्या (रविवार) होणार आहे. त्या प्रस्तावावरील मतदान इम्रान यांचे भवितव्य ठरवेल. त्यामुळे माजी क्रिकेटपटू असणारे इम्रान सत्तेच्या खेळपट्टीवर टिकणार की बाद होणार ते स्पष्ट होईल.
पाकिस्तानमधील विरोधकांनी काही दिवसांपूर्वी संसदेत 69 वर्षीय इम्रान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे इम्रान यांचे आसन डळमळू लागले आहे. त्यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षातील काही सदस्यांनी बंड पुकारले आहे. तसेच, दोन मित्रपक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे इम्रान यांचे सरकार अल्पमतात आले आहे. पाकिस्तानी संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या नॅशनल असेंब्लीत अविश्वास प्रस्तावावर मतदान होईल.
त्या सभागृहाचे एकूण संख्याबळ 342 इतके आहे. विरोधकांनी आणलेला प्रस्ताव हाणून पाडण्यासाठी इम्रान यांना 172 मतांची गरज आहे. मात्र, विरोधकांनी आपल्याबरोबर 175 सदस्य असल्याचा दावा केला आहे. मतदानावेळी तो खरा ठरल्यास इम्रान यांचे सरकार कोसळेल. सरकार अल्पमतात आल्याने इम्रान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. पण, ती मागणी धुडकावत अखेरच्या चेंडूपर्यंत खेळण्याचा निर्धार इम्रान यांनी बोलून दाखवला आहे.
पाकिस्तानात वारंवार राजकीय अस्थिरता निर्माण होते. त्या देशातील कुठल्याच पंतप्रधानाने आतापर्यंत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. त्याशिवाय, अविश्वास प्रस्तावामुळे कुठल्याच पंतप्रधानाला सत्ता गमवावी लागलेली नाही. त्या बाबींना इम्रान अपवाद ठरणार का ते समजण्यासाठी काहीच अवधी बाकी आहे.