लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्यानंतर आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. लवकर निवडणुका घेऊन चूक सुधारा. अन्यथा, आयात सरकार घालवण्यासाठी माझे समर्थक पाकिस्तानच्या राजधानीत (इस्लामाबाद) दाखल होतील, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. तो इशारा पाकिस्तानी लष्करासाठीही असल्याचे मानले जाते.
इम्रान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाची गुरूवारी रात्री लाहोरमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घेण्याची मागणी पुढे केली. निवडणुकांशिवाय मला काही नकोय, अशी भूमिका त्यांनी मांडली. इम्रान सातत्याने सत्तेबाहेर जाण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला जबाबदार धरत आहेत.
त्याशिवाय, परकी हस्तक्षेपामुळे आपल्याला सत्ता गमवावी लागल्याचा आरोप ते करत आहेत. त्यातून ते विरोधकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारचा उल्लेख आयात सरकार म्हणून करत आहेत. पाकिस्तानात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या लष्कराची भूमिका राजकीय घडामोडींसाठी महत्वाची मानली जाते. लष्कराचा पाठिंबा गमावल्यानेच इम्रान यांना सत्ता सोडावी लागल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.