नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारतात झालेल्या भव्य आणि अभूतपूर्व स्वागतामुळे प्रचंड भारावले. त्यातून त्यांनी मला सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्याचा फिल आल्याची भावना व्यक्त केली.
भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी जॉन्सन गुरूवारी गुजरातमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागताचे अनेक फलक रस्त्यांवर झळकताना दिसले. त्याचा संदर्भ जॉन्सन यांनी शुक्रवारी येथे मोदींसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.
भव्यदिव्य स्वागताबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले. पत्रकार परिषदेवेळी मोदी आणि जॉन्सन यांच्यातील निकटता, त्यांच्यामधील संवादातील सहजतेची चुणूकही दिसली. जॉन्सन यांनी मोदींचा उल्लेख हिंदीतून खास दोस्त नरेंद्र असा केला. त्यांनी वारंवार मोदींविषयी बोलताना त्यांचे पहिले नाव उच्चारले.