नवी दिल्ली – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमधील रिक्तपदे येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत भरण्याचा आदेश दिला आहे. या सर्व विद्यापीठांत सुमारे सहा हजार रिक्तपदे आहेत असे सांगण्यात येते.
देशातील 45 केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंशी त्यांनी शुक्रवारी प्रथमच संवाद साधला त्यावेळी त्यांनी सर्वांना मिशन मोडमध्ये काम करण्याचे आवाहन करतानाच ही रिक्तपदे भरण्याचा आदेश दिला.
सर्व विद्यापीठांना 10 सप्टेंबर पर्यंत रिक्त जागा भरण्याच्या संबंधात जाहिराती प्रसारित कराव्यात अशी सूचनाही त्यांनी केली. कोविड निर्बंध आता शिथिल करण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांचे वर्ग आता नियमीत सुरू होत आहेत.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या संबंधातही त्यांनी कुलगुरूंना सावधगिरीच्या सुचना दिल्या. विद्यापीठाच्या आवारातील वातावरण प्रवाही ठेवा, पण त्यातून वर्गाच्या कामकाजावर तसेच शिक्षणाच्या कामात कोणताही अडथळा येता कामा नये याचीही दक्षता घ्या अशी सूचनाही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात दहशतवादाच्या विरोधात नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहे त्याबद्दल प्रधान यांनी या विद्यापीठाचे कौतुक केले. या दहशतवादाचा उल्लेख करताना जिहादी दहशतवाद असा उल्लेख केला गेला आहे त्याबद्दल आता आक्षेप सुरू झाला आहे.
आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत स्पेशलायझेशन करणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी स्थानिक व मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्याचीही सूचना केली.