पाटणा – बिहारमधील कॉंग्रेस नेता म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने निवडणूक तिकिटासाठी 5 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. त्यावरून येथील न्यायालयाने काही कॉंग्रेस नेत्यांबरोबरच राजदचे नेते तेजस्वी यादव आणि त्यांच्या खासदार भगिनी मीसा भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे तेजस्वी पुत्र, तर मीसा या कन्या आहेत.
कॉंग्रेसचे नेते म्हणवणाऱ्या संजीवकुमार सिंह यांनी फसवणुकीचा आरोप करणारी याचिका दाखल केली. देशात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारच्या भागलपूर मतदारसंघातून रिंगणात उतरण्यास सिंह इच्छूक होते. त्यांना कॉंग्रेसचे तिकीट हवे होते. मात्र, पैसे देऊनही उमेदवारी न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांच्या याचिकेची दखल घेऊन स्थानिक न्यायालयाने तेजस्वी, मीसा यांच्यासह कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदनमोहन झा आणि इतर काही कॉंग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्याबाबत राजदकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तक्रारदाराने कॉंग्रेसचे तिकीट हवे असल्याचे नमूद केले. मात्र, त्याने आमच्या पक्षाच्या नेत्यांनाही आरोपी बनवले, अशी प्रतिक्रिया राजदने दिली. बिहार कॉंग्रेसने संबंधित घडामोडीबद्दल कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही.
राजद आणि कॉंग्रेस हे मित्रपक्ष आहेत. संबंधित निवडणूक त्या पक्षांनी एकत्रितपणे लढवली. त्यावेळी भागलपूरची जागा राजदच्या वाट्याला गेली. मात्र, त्या जागेवर राजदच्या उमेदवाराचा पराभव करून जेडीयू उमेदवाराने बाजी मारली.