कोल्हापूर – बालिकेवर लैगिंक अत्याचार प्रकरणी आरोपी धनाजी विश्वास कोळी (वय २५ रा. लाटवडे, ता. हातकणंगले) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. महात्मे यांनी चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि वीस हजार रुपये दंड ठोठावला.
या खटल्याची हकीकत अशी की आरोपी कोळी हा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर चालक म्हणून काम करत होता. एका बालिकेशी त्याने ओळख वाढवून ती शाळेला ये जा करताना मोटार सायकवरुन तिचा पाठलाग करत होता.
बालिका अल्पवयीन आहे हे माहित असून १७ फेब्रुवारी २०१८ रोजी वेळोवेळी वाईट हेतून वडगाव ते नागावपर्यंत मोटार सायकलवरुन पाठलाग करत होता. तसेच आरोपीने बालिकेचा हात धरुन माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून लज्जा होईल असे वर्तन केले. त्यानंतर बालिकेच्या पालकांनी वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास तत्कालिन उप विभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी केला. त्यानंतर आरोपीविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी आठ साक्षीदार तपासले. पिडीत मुलगी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी वकील कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून कोर्टाने आरोपी कोळी यास चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला.