वॉशिंग्टन: करोना विषाणूच्या संसर्गाने अमेरिकेत आतापर्यंत चार हजारावर बळी गेले असून 9/11 च्या हल्ल्यापेक्षाही बळींची संख्या अधिक झाली आहे. अमेरिकेत 1 ते 2 लाख लोक करोनाच्या साथीत मरतील असा अंदाज वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अमेरिकेत 1 लाख शवपेट्यांची ऑर्डर देण्यात आली आहे.
अमेरिकेत मरण पावलेल्यांची संख्या चीनमधील करोनाच्या बळींपेक्षा अधिक झाली आहे. चीन हे या विषाणूचे प्रमुख केंद्र होते. तेथील बळींची संख्या 3,310 होती. जगात या विषाणूने 42 हजार बळी घेतले असून 8 लाख 60 हजार निश्चित रुग्ण आहेत. चीनमध्ये 82,294 रुग्ण असून तो आता चौथ्या क्रमांकावर गेला आहे.
पुढील दोन आठवडे महत्त्वाचे असून कुठल्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास सज्ज रहावे लागेल, असे अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. अतिशय वेदनादायी असे पुढील दोन आठवडे असतील. आम्ही बराच अभ्यास करून काही अंदाज वर्तवले आहेत. करोना दलाच्या सदस्य देबोरा बिक्स यांनी म्हटले आहे की, कितीही कठीण र्निबध लागू केले तरी 1 ते 2 लाख बळी जाण्याची शक्यता आहे. जर काहीच उपाययोजना केल्या नाहीत तर मृत्यूची संख्या 15 ते 22 लाख राहील.