मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणूकांसाठी पक्षांनी कंबर कसली असून भाजप, काँग्रेस, शिवसेने सह आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवारांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईकनिंबाळकर यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी देखील ट्विट च्या माध्यमातून दिली असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे’. अशा आशयाचे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.
दरम्यान,आज दोन्ही ज्येष्ठ नेते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. या निवडणुकीसाठी काल अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर 10 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यात भाजप 4, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी 2 असे एकूण 10 आमदार निवडले जाऊ शकतात.
विधानपरिषदेसाठीची आतापर्यंतची उमेदवार यादी
१) भाजप -प्रवीण दरेकर ,उमा खापरे,राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड असे एकूण ५ उमेदवार
२) काँग्रेस – भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे (२)
३)शिवसेना-सचिन अहिर, आमश्या पाडवी(२)
४)राष्ट्रवादी -एकनाथ खडसे , रामराजे नाईक निंबाळकर (२)