अमेरिकेच्या या कारवाईमुळे सध्यातरी आयसीसचं कंबरडं मोडलं आहे यात शंकाच नाही. जिहादी दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकेसाठी हा जिहादविरुद्धचा डावपेचात्मक आणि सामरिक विजय आहे. आयसीसचा मूलतत्त्ववाद, नेतासमूह आणि एक छत्री हुकूमतीचा अंत झाला आहे. लादेन आणि बगदादीच्या ऑपरेशन्समध्ये खूपच समानता आहे, पण यामुळे जिहादी दहशतवाद संपुष्टात आलेला नाही. तथापि, आजही इस्लामिक स्टेट 18 देशांमध्ये कार्यरत आहे. बगदादीचं इस्लामिक स्टेट भारतात वैचारिक व कार्यपद्धतीच्या अनुषंगाने जिवंत आहे आणि आता ते भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.
26/27 ऑक्टोबर 2019च्या रात्री सीरियाच्या इडलीब प्रांतातील बारिश गावामधल्या लोकांना हेलिकॉप्टर्सच्या रोटरी विंग्जच्या घिरट्यांचा आवाज आणि अंदाधुंद फायरचे आवाज ऐकू आले. त्या क्षेत्रात रात्रीच्या वेळी येणारे असले आवाज केवळ मृत्यूची सूचना देत असतात. मात्र, यावेळी इराकमधून उड्डाण करत 500 किलोमीटरचे अंतर पार करणाऱ्या त्या चिनुक आणि ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्समधून उतरणाऱ्या असंख्य अमेरिकन कमांडोंचं लक्ष्य फक्त आयसीसचा सर्वेसर्वा खलिफा अबू बक्र अल बगदादी होता. त्या हेलिकॉप्टर गनशिप्सपैकी काही रायफल्स व मशीनगन्सचा मारा झेलत त्या क्षेत्रावर घिरट्या घालत उर्वरित हेलिकॉप्टर्समधून उतरणाऱ्या रेंजर्स आणि डेल्टा फोर्सच्या कमांडोंना बगदादीच्या हवेलीजवळ उतरण्यासाठी फायर कव्हर देत होते. या सैनिकांना बगदादीच्या अतिशय कट्टर, विश्वासू अशा 70 सहकाऱ्यांशी लढा द्यायचा होता. त्यांचं ध्येय एकच होतं, बगदादीला जिवंत पकडणे किंवा ठार मारणे.
अमेरिकेनं बगदादीवर अनेक दिवस पाळत ठेवली होती. बगदादी सतत आपले राहण्याचं ठिकाण बदलत असल्यामुळे तो असलेल्या ठिकाणांवरचे दोन-तीन हल्ले अमेरिकेला शेवटच्या क्षणी पुढे ढकलावे लागले. सप्टेंबरमध्ये अमेरिकेने बगदादीच्या असंख्य बायकांपैकी एकीला, त्याचा एक सहकारी व दोन भाच्यांसह अटक करून त्यांच्याकडून बगदादीच्या पश्चिम इराकमधील “हाईड आउट’ची माहिती मिळवली होती. त्या हाईड आउटवर रेड केली असता बगदादीच्या अल कायदाच्या प्रभुत्वाखाली असलेल्या उत्तर पश्चिम सीरियातील घराचा पत्ता अमेरिकेला सीआयएच्या माध्यमातून मिळाला.
उत्तर सीरियात आयसीसचं वर्चस्व नसतानाही बगदादी इडलीबमध्ये वास्तव्यास होता. कारण आयसीसच्या या अवकर्षाच्या काळात बहुदा त्याला सीरिया व इराकमधील इतर मोठ्या जिहादी धड्यांचं एकत्रीकरण करायचं होतं. या माहितीच्या आधारे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पनी 23 ऑक्टोबरला पेंटागॉनला बगदादीच्या खातम्याचे आदेश दिले आणि पेंटागॉन, सीआयए आणि रेंजर्स कामाला लागले. या अमेरिकन सैनिकांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टर्सना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी, रशियन, सीरियन आणि तुर्किस्तानच्या हवाई हद्दींमधून प्रवास करावा लागला. हे अतिशय नाजूक मिशन होतं. कारण कोणालाही कुठलीही पूर्व सूचना न देता या हवाई हद्दींमधून जाणं म्हणजे त्यांच्यावर आक्रमण करण्यासारखं होतं. त्यामुळं अमेरिकेनं मास्को, दमास्कस आणि अंकाराला आपल्या प्रवासाची पूर्वसूचना दिली. तसेच आपल्या अंतिम लक्ष्याबद्दल काहीही वाच्यता केली नाही.
घराच्या दरवाज्यात गुप्त स्फोटक बसवले असतील अशी शंका असल्यामुळं अमेरिकन कमांडोंनी बगदादी राहात असलेल्या घराच्या भिंतींना उद्ध्वस्त करत आत प्रवेश केला. बगदादीच्या दोन बायकांनी स्फोटकांनी भरलेली आत्मघातकी बनियन्स घेतल्या होत्या, पण सुदैवानं या धुमधामीत त्यांनी त्याचा स्फोट केला नाही; अन्यथा अनेक अमेरिकन कमांडोंचा खातमा झाला असता. बगदादीचं वास्तव्य असलेल्या इमारतीच्या खोल्या एकामागोमाग एक करून धुंडाळतांना अमेरिकन कमांडोंनी 11 लहान मुलांना एका खोलीतून जिवंत बाहेर काढलं आणि 17 इस्लामिक दहशतवाद्यांना अटक केली. इमारतीचं आवार आणि खोल्यांची झडती घेताना अमेरिकन कमांडो आणि त्यांच्या बरोबर असलेल्या शोधक श्वानांनी (स्निफर डॉग्ज) बगदादीचा शोध चालूच ठेवला. या गडबडीत त्यापैकी एका कमांडोला बगदादी तीन लहान मुलांबरोबर एका टनेलमध्ये शिरताना दिसला. कमांडोंच्या माहितीनुसार त्या बोळकांडाचं दुसरं प्रवेशद्वार बंद सील्ड होतं. त्यामुळे बगदादीमागे स्वतः न जात कमांडोंनी आपले शिकारी कुत्रे त्यात घुसवले. बहुदा बगदादीला मागावर येणाऱ्या कुत्र्यांचा आवाज ऐकू आला असल्यानं त्यानं आपल्या अंगात घातलेल्या सुईसाईड वेस्टचा स्फोट केला असावा आणि त्यामुळे त्या तीन अतिशय घाबरलेल्या मुलांबरोबर बगदादीचा अंत झाला.
उर्वरित आयसीस समर्थक सैनिकांची माहिती मिळवण्यासाठी अमेरिकन कमांडोंनी जाताजाता हाती लागेल तो संगणक, भ्रमणध्वनी, कागदपत्रे आपल्या बरोबर नेली. बगदादीच्या घरावर पोहोचल्यापासून दोन तासांच्या आतच अमेरिकन डेल्टा फोर्स आपल्या हेलिकॉप्टर्सनी आलेल्या मार्गे सीरियाबाहेर पडला. जाताजाता, बगदादीच्या लपण्याच्या ठिकाणाचं भूतलावरील नामोनिशाण मिटवण्यासाठी आणि
स्वतःच्या खुणा पुसून टाकण्यासाठी कमांडोंनी अमेरिकन ड्रोन्सद्वारे बगदादीच्या लपण्याच्या ठिकाणावर मिसाईल हल्ले केले. ज्यावेळी एकही कमांडो न गमावता, सर्व टीम सुखरूप परत आल्याची खात्री झाली त्यावेळी राष्ट्रपती ट्रम्पनी बगदादीच्या खातम्याची माहिती संपूर्ण जगाला दिली. इकडे अमेरिकन कमांडोंनी मलब्यानं भरलेलं ते बोळकांडं खोदणं सुरू केलं. बोळकांडाच्या शेवटाला त्यांना बगदादीचे छिन्नविछिन्न अवशेष मिळाले, पण कमांडोंबरोबर असलेल्या तंत्रज्ञानपाशी डीएनए टेस्टिंग किट असल्यामुळे त्यांनी त्या अवशेषांची डीएनए टेस्ट करून केवळ पंधरा मिनिटांमध्ये “हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्ट, जॅकपॉट ओव्हर’ हा विजय संदेश व्हाईट हाऊसला दिला. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनला दिलेलं जॅकपॉट हे छद्म नाव (कोड नेम) यावेळी बगदादीला देण्यात आलं होतं. सील टीम 36च्या सन्मान चिन्हातील त्रिशुळावरून बिन लादेनच्या कारवाईला “ऑपरेशन नेपच्यून स्पियर’ नाव देण्यात आलं होतं. यावेळी मात्र बगदादीनं अपहरण करून स्वतःची रखेल म्हणून वापरलेल्या आणि नंतर अतिशय क्रूरपणे मारून टाकलेल्या अमेरिकन मानवाधिकार कार्यकर्ती मिस कायला म्यूलरसाठी बगदादीच्या खातम्याला “ऑपरेशन ऑब्लिटरेशन’ हे नाव देण्यात आलं होतं.
आपल्या कमांडर्सशी संवाद साधतांना तो नेहमी एक मुखवटा धारण करत असल्यामुळे बगदादीला इनव्हिजिबल शेख हे नाव बहाल करण्यात आलं होतं. इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल बद्री हे त्याचं मूळ नाव होतं. ते सर्व प्रॉफेट महंमदचे वंशज आहेत अशी श्रद्धा त्याच्या कबिल्यात आहे. 1971 मध्ये एका मध्यमवर्गीय घरी इराकमधील समरा शहरात जन्माला आलेल्या बगदादीला मी एक दिवस खलिफा बनणार याची पूर्ण खात्री होती. 2003 मध्ये इराकवर आक्रमणकर्त्या अमेरिकेविरुद्धच्या संघर्षात तो सहभागी झाला. 2004 मध्ये त्याला अटक करण्यात अली आणि त्याला अबू घरीब आणि बक्का येथील कारावासात ठेवण्यात आलं. तेथे तो कट्टर जिहाद्यांच्या संपर्कात आला आणि 2006 मध्ये कैदेतून सुटल्यावर तो अल कायदा (इराक) मध्ये दाखल झाला. 2010 मध्ये बगदादीच्या अधिपत्याखाली या संघटनेनं आयसीस हे नाव धारण केलं आणि 2014 मध्ये 80 लाख लोकांच्या खलिफतीचा तो खलिफा बनला. त्यावेळी आयसीसमध्ये अंदाजे 40-60,000 सैनिक होते.
बगदादीच्या नेतृत्वात आयसीसनं इराक व सीरियातील ख्रिश्चन, यहुदीज आणि शिया मुसलमानांवर अनन्वित व अमानुष, निर्घृण अत्याचार केले. आयसिसच्या क्रौर्य व्हिडीओंनी जगाला हादरवून टाकलं. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्पनी “ही डाईड लाईक ए डॉग’ अशा शब्दांमध्ये आनंद दर्शवला. लादेन आणि बगदादीच्या ऑपरेशन्समध्ये खूपच समानता आहे, पण यामुळे जिहादी दहशतवाद संपुष्टात आलेला नाही. अल कायदाचे हजारो सैनिक आणि शेकडो स्लीपर सेल्स दक्षिण एशिया, आफ्रिका आणि पाश्चिमात्य देशांमध्ये भूमिगतरीत्या वावरत आहेत. इस्लामिक स्टेट 18 देशांमध्ये कार्यरत आहे. दोघांनी मिळून 2019 मध्ये जगभरात 1800हून अधिक जिहादी हल्ले केले आहेत.
आयसीसचे सैनिक मुख्यतः इराक व सीरियातले असले तरी मध्यपूर्व देश, उत्तर आफ्रिका, युरेशियन राष्ट्रे, रशिया, चीन, युरोप आणि अमेरिकेतील इस्लामी मूलतत्ववादाकडे आकृष्ट झालेले अनेक विदेशी जिहादी देखील आयसीसमध्ये कार्यरत होते. आयसीसच्या अमानुष क्रौर्याला अबू बक्र अल बगदादी जबाबदार होता. किंबहुना हिंसक क्रौर्याच्या माध्यमातून जागतिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनीच आयसीसला प्रवृत्त केलं असं म्हटल्यास ते वावग होणार नाही. बहुसंख्येत सुळावर चढवणे, लिंगबद्ध गुलामी आणि शरीराचे तुकडे करणं, दगडांनी ठेचून मारणं, गळा कापणं व जिवंत जाळणं या अमानुष प्रकारांनी बगदादीनी जगभरातील सामान्य जनतेला हादरवून टाकलं आणि त्याचबरोबर असंख्य हिंसक स्वयंसेवक सैनिकांना आपल्याकडे आकृष्ट केलं होतं. 2014 मध्ये अमेरिकेने त्याच्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस ठेवलं आणि 2017 मध्ये ते वाढवून 25 दशलक्ष डॉलर्स केलं.
अबू बक्र अल बगदादीच्या मृत्यूनंतर सद्दाम हुसेनच्या सेनेतील अब्दुल्ला कार्देश ऊर्फ हाजी अब्दुल्ला अल काफरींनी आयसीसची धुरा हाती घेतली, पण तो आणि बगदादीचा उजवा हात व मुख्य प्रवक्ता असलेला अबू हसन अल मुजाहीर देखील जाराब्ल्यूसच्या हवाई हल्ल्यात मारले गेले. बगदादीच्या मृत्यूनंतर नवा नेता निवडून त्याची सत्ता चालेपर्यंतच्या अंतरिम काळात, आयसीसचे असंख्य सैनिक पाकिस्तानमध्ये आश्रयाला येतील यात शंकाच नाही. पाकिस्तानमध्ये तीन प्रकारचे जिहादी आहेत. अफगाणिस्तानमध्ये कार्यरत क्वेटा शूरा तालीबान, हक्कानी नेटवर्क व पश्तून जिहादी, काश्मीरमध्ये कार्यरत लष्कर-ए-तय्यबा व जैश-ए-महंमदचे पंजाबी जिहादी आणि ज्यांना विदेशी जिहादी म्हणतात ते अल कायदाचे अरब जिहादी, इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उझबेगिस्तानचे उझबेग जिहादी आणि तुर्कीस्तान इस्लामिक मुव्हमेंटचे चीनी उइघिर जिहाद्यांच्या जोडीला आता आयसीसचे खुंखार, हिंसक जिहादी येतील. हे सर्व पाकिस्तानी सेना आणि आयएसआयचे स्ट्रॅटेजिक असेट्स आहेत. लष्कर व जैशच्या जोडीला पाकिस्तान आयसीसच्या जिहाद्यांना काश्मीरमध्ये पाठवेल. सर्व जिहादी भारतातील असंख्य स्लीपर सेल्सच्या माध्यमातून काश्मीर आणि उर्वरित भारतात जिहादी हैदोस माजवतील. भारतीय सेनेने काश्मीरमध्ये स्थैर्य आणण्यात सफल झाली आहे. या शांततेला भंग करण्यासाठी पाकिस्तान या जिहाद्यांचा वापर करेल. त्यामुळे या वावटळीला तोंड देण्यासाठी भारत सरकारर सदैव सज्ज राहाणं अत्यावश्यक असेल.
कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)