पुणे – रेल्वे प्रवाशांना जनरल डब्यातून प्रवास करण्याचे तिकीट लवकर मिळण्यासाठी पुणे विभागाने “ऑपरेशन पाच मिनिटं’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. यातून खिडकीवरून अनारक्षित तिकिटे खरेदी करण्यास लागणारा वेळ कमी होणार आहे.
रेल्वे स्थानकांवर केवळ पाच मिनिटांत तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली. ही मोहीम पुणे मंडल रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, सुरेशचंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.
प्रवाशांनो, फीडबॅक नोंदवावा
या मोहिमेबाबत प्रवाशांना माहिती मिळावी, यासाठी पुणे स्टेशन, शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, तळेगाव, सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर स्थानकांवर ठिकठिकाणी एलईडी बोर्ड लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रवाशांनी याबाबत 9766-353-772 या मोबाइल क्रमांकावर फीडबॅक नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.