पुणे – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत २८ देशांतील अव्वल टेनिसपटूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल १०० खेळाडूंमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या भारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू सुमित नागलचा देखील समावेश असणार आहे. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथे १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेसाठी पाच वर्षांचा करार केला असुन १७ ते २५ फेब्रुवारी या कालावधी दरम्यान रंगणारी ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त राजेश देशमुख यांनी दिली.
एमएसएलटीएचे चेअरमन आणि स्पर्धा सहसंचालक प्रशांत सुतार म्हणाले की, या चॅलेंजर स्पर्धेचे शहरात यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आम्हाला आनंद होत असून या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना बहुमोल एटीपी गुण आणि अनुभव मिळणार आहे. भारताच्या रामकुमार रामनाथन आणि ससीकुमार मुकुंद या दोन्ही खेळाडूंना मुख्य फेरीसाठी वाईल्ड प्रदान करण्यात आले असल्याचे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी नमूद केले.