पुणे – शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यात मराठी, हिंदी, इंग्रजीचे धडे देण्यास सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला आहे.
करोना काळातच अकरावी प्रवेशाची एक फेरी पूर्ण झाली असून, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पुढची प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे अकरावीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. महाविद्यालये सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गुगल क्लासरुम, झूम, युट्युब या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
विद्या प्राधिकरणाच्या वतीने या ऑनलाइन शिक्षणासाठी संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. सोमवारपर्यंत (दि.2) राज्यातील 1 लाख 22 हजार 142 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यात कला-14,372, वाणिज्य- 41,288, विज्ञानशाखेतील 66,482 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 20,267 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. गडचिरोलीतून सर्वांत कमी 397 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
राज्यातील तब्बल 2 लाख 18 हजार 910 जणांनी ऑनलाइन वर्गांचा पहिल्याच दिवशी लाभ घेतला. सध्या दररोज सकाळी 8.30 ते 11 या वेळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.