पुणे – राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. माने यांच्याकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चुकीची वागणूक दिली जात असल्याची तक्रार करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली.
याबाबत उच्च शिक्षण संचालनालयातील मुख्य लिपिक स्वाती वेदपाठक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे लेखी तक्रार केली. वेदपाठक यांना 29 ऑक्टोबर रोजी माने यांनी अपशब्द वापरले. माने यांचे वर्तन अत्यंत असभ्य आणि बेजबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
राज्याच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयांमध्ये सुमारे दीडशे कर्मचारी आहेत. राज्याचे शिक्षण विषयक महत्त्वपूर्ण निर्णय या कार्यालयातून घेतले जातात. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे कामकाज सोमवारी पूर्णपणे ठप्प राहिले.
दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांना मी अपशब्द वापरला नाही. माझ्या बोलण्याचा त्यांनी गैरसमज करून घेतला असावा, असे माने यांनी म्हटले आहे.