बुलडाणा – दारूच्या उधारीच्या पैशांसाठी अवैध दारू विक्रेत्याने एका व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे घडला आहे. या घटनेत पीडित व्यक्तीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपीवर मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवधाबा येथील काशिनाथ राजाराम उगले (वय 45) हा गावातील अवैध दारू विक्रेते अशोक गणपत भिसे यांच्या घरी दारू पिण्यासाठी गेला. दारू मागितली असता यावेळी भिसे याने मागील उधारीचे दहा रुपये दे, मग दारू देतो, असे म्हटले. मात्र, काशिनाथ उगले याने नंतर देतो म्हणून सांगितले आणि पुन्हा दारू मागितली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
यावेळी दारू विक्रेता अशोक भिसे याने घरात जाऊन प्लॅस्टिक बॉटलमध्ये पेट्रोल आणले आणि काशिनाथ राजाराम उगले याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. यात उगले गंभीर भाजला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.
पीडित व्यक्तीला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला, याबाबतची तक्रार काशिनाथ राजाराम उगले याने ग्रामीण पोलिसांना दिली. यानंतर अशोक भिसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला तत्काळ अटकही केली. यानंतर त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.